Uncategorized

दुष्काळग्रस्त शेतकरी महिलांची दिवाळी गोड; नातेपुते येथे खासदार ज्योती वाघमारे यांच्या हस्ते १ हजार महिलांना आनंदाचा शिधा वाटप

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

नातेपुते : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने राजकुमार ओबीसी जिल्हाप्रमुख हिवरकर पाटील यांच्या प्रयत्नातून नातेपुते येथे विशेष उपक्रम राबविण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाठविण्यात आलेल्या आनंदाच्या शिध्याचे वाटप खासदार ज्योती वाघमारे यांच्या हस्ते माळशिरस तालुक्यातील १ हजार शेतकरी महिलांना करण्यात आले. या उपक्रमामुळे दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड झाली.

शिवसेना भवन, नातेपुते येथे आयोजित या कार्यक्रमात बोलताना खासदार ज्योती वाघमारे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांनाही दुष्काळाची झळ बसत आहे. खासदार झाल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी दुष्काळाच्या सावटाखाली आली आहे. त्यामुळे ही दिवाळी घरात साजरी न करता शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतमजुरांसोबत आणि बळीराजाच्या सहवासात साजरी करण्याचा संकल्प आपण केला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी हजारो ट्रकच्या माध्यमातून आनंदाचा शिधा पाठविण्यात आला आहे. ‘मदतीचे धोरण हेच शिवसेनेचे तोरण’ या विचारातून शिवसेना बळीराजाच्या बांधावर पोहोचत आहे. राज्याचा दौरा करताना माळशिरस तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता आणि महिलांच्या चेहऱ्यावरील चिंता प्रकर्षाने जाणवली. मात्र, एकनाथ शिंदे यांचे नाव घेताच महिलांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य पाहून त्यांचा लाडक्या बहिणींमध्ये असलेला विश्वास दिसून आला. याच भावनेतून महिलांच्या मुलाबाळांसाठी आणि कुटुंबीयांसाठी आनंदाचा शिधा घेऊन आपण येथे आल्याचे त्यांनी सांगितले. राजकुमार हिवरकर पाटील यांच्या माध्यमातून हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख (ओबीसी) राजकुमार हिवरकर पाटील यांनी शिवसेनेच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करताना सांगितले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्त्वावर काम करत आहे. माळशिरस तालुक्यातील ५५ गावांमधील शेतकरी महिलांना एकत्रित आणून आनंदाचा शिधा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महिलांना मिळालेला हा शिधा त्यांच्या कुटुंबासाठी आणि लेकराबाळांच्या दिवाळीसाठी उपयोगी ठरेल. संकट मोठे असले तरी एकनाथ शिंदे आणि शिवसैनिक शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

या कार्यक्रमात एकूण १ हजार शेतकरी महिलांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला. दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत दिवाळीच्या सणासाठी मिळालेल्या या मदतीमुळे महिलांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

यावेळी व्यासपीठावर सोलापूरचे नगरसेवक प्रदर्शन साठे, ज्येष्ठ नेते शंकरराव हिवरकर पाटील, भीमराव भुसणार, तानाजीराव भोळे, दादासाहेब लोखंडे, भाजपचे युवा नेते मनोज जाधव, तेजस गोरे, सुनील बनकर, चेअरमन रंजीत जठार, लालासाहेब मोटे, दत्ताभाऊ गोरे, संग्राम हिवरकर पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button