Uncategorized

प्रताप क्रीडा मंडळाच्या बालक्रीडा स्पर्धेत १,६८२ चिमुकल्या खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात

अकलूज : लहान वयातच मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील सुप्त क्रीडागुणांना व्यासपीठ मिळावे आणि भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू घडावेत, या व्यापक उद्देशाने शंकरनगर-अकलूज येथील प्रताप क्रीडा मंडळ सातत्याने बालक्रीडा स्पर्धांचे आयोजन करत आहे. याच उपक्रमांतर्गत रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल येथे आयोजित बालक्रीडा स्पर्धेत तालुक्यातील १४ शाळांमधील तब्बल १,६८२ बालक्रीडापटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या प्रताप क्रीडा मंडळाच्या या उपक्रमामुळे बालक्रीडापटूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली. मैदानावरील उत्साह, चिमुकल्यांची जिद्द आणि विजयासाठीची धडपड यामुळे संपूर्ण क्रीडा संकुलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आकाशात कबुतरे सोडून आणि मैदानाचे पूजन करून स्पर्धेचा शुभारंभ झाला. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील आणि श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन बालखेळाडूंच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी दीपकराव खराडे-पाटील, महादेव अंधारे, हर्षवर्धन खराडे-पाटील, मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले-पाटील, सचिव बिभीषण जाधव, मंडळाचे आजी-माजी संचालक, सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत वयोगट व इयत्तेनुसार सहा विविध खेळप्रकारांचा समावेश करण्यात आला होता. डोक्यावर चेंडू घेऊन धावणे, धावण्याची शर्यत, कमरेवर हात ठेवून उड्या मारणे, लंगडी घालत जाणे, तीन पायांची शर्यत आणि पोत्यात पाय घालून उड्या मारणे अशा मनोरंजक व कौशल्यपूर्ण स्पर्धांमध्ये मुला-मुलींनी सहभाग घेतला.

स्पर्धेतील गटनिहाय विजेते पुढीलप्रमाणे :

१. लहान गट — डोक्यावर चेंडू घेऊन धावणे (४० मीटर)

मुली : प्रथम — अर्पिता बोरकर, द्वितीय — सानवी बनसोडे, तृतीय — यशस्वती खराडे-पाटील.

मुले : प्रथम — विवान कांबळे, द्वितीय — चरण शिंदे, तृतीय — शंभू चव्हाण.

२. मोठा गट — धावणे (६० मीटर)

मुली : प्रथम — संजीवनी मगर, द्वितीय — सान्वी होवाळ, तृतीय — अनया रिसवडकर.

मुले : प्रथम — कार्तिक कोडग, द्वितीय — शिवांश जाधव, तृतीय — तैमूर पठाण.

३. इयत्ता पहिली — कमरेवर हात ठेवून उड्या मारणे (४० मीटर)

मुली : प्रथम — समायरा शेख, द्वितीय — स्वरा चव्हाण, तृतीय — रिया विटकर.

मुले : प्रथम — मल्हार जाधव, द्वितीय — हर्ष बनसोडे, तृतीय — आलोक वराडे.

४. इयत्ता दुसरी — लंगडी घालत जाणे (४० मीटर)

मुली : प्रथम — अक्षरा गुरवे, द्वितीय — स्वरा शिंदे, तृतीय — शिवश्री भगत.

मुले : प्रथम — निहाल गावकर, द्वितीय — वृषभ जाधव, तृतीय — शौर्य होवाळ.

५. इयत्ता तिसरी — तीन पायांची शर्यत (४० मीटर)

मुली : प्रथम — ईश्वरी कांबळे व नंदिनी यादव, द्वितीय — हिंदवी पेचे व रिया जानकर, तृतीय — मुक्ता माने-देशमुख व आरोही चव्हाण.

मुले : प्रथम — आहान शेख व हसनैन शेख, द्वितीय — स्वरूप काळे व महेश शिंदे, तृतीय — कार्तिक पाटील व प्रणव भगत.

६. इयत्ता चौथी — पोत्यात पाय घालून उड्या मारणे (५० मीटर)

मुली : प्रथम — सुप्रिया गोफणे, द्वितीय — सिमरन कोडग, तृतीय — स्वरांगी पाटील.

मुले : प्रथम — निरंजन पवार, द्वितीय — रुद्राक्ष खत्री, तृतीय — अरमान तांबोळी.

विजेत्यांना बक्षिसे; सहभागी बालकांना खाऊ

विजेत्या खेळाडूंना अनुक्रमे तीन चाकी सायकल, कॅरम बोर्ड, स्कूल बॅग, टिफिन बॉक्स, पाण्याची बाटली आणि प्रमाणपत्रे अशी बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेतील पाच क्रमांकांपर्यंतच्या खेळाडूंना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सहभागी सर्व बालकांना खाऊ वाटप करण्यात आले.

स्पर्धेच्या यशस्वितेसाठी स्पर्धाप्रमुख शिवाजी पारसे, भानुदास आसबे, संजय राऊत, अर्जुन बनसोडे, पंच, क्रीडाशिक्षक, पालक आणि समितीतील सदस्यांनी परिश्रम घेतले. आनंत कोळी व पोपट पवार यांनी सूत्रसंचालन केले, तर भानुदास आसबे यांनी आभार मानले. ध्वजावतरणाने स्पर्धेची सांगता झाली.

आजचे चिमुकले, उद्याचे आंतरराष्ट्रीय खेळाडू! “लहान मुलांसाठी आयोजित केलेले हे उपक्रम आकाराने छोटे वाटत असले, तरी त्यातून मुलांचा आत्मविश्वास वाढतो, खिलाडूवृत्ती विकसित होते आणि खेळाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. बालवयातील अशा स्पर्धांमधूनच भविष्यात मोठे खेळाडू घडू शकतात. मुलांमधील सुप्त क्रीडागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे आणि जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, हाच प्रताप क्रीडा मंडळाच्या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.” — जयसिंह मोहिते-पाटील, संस्थापक अध्यक्ष, प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button