Latest News

शेतकऱ्यांनो सावध व्हा… ! खत खरेदी विक्रीसाठी आता नवीन नियम ; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

महर्षि डिजीटल न्यूज 

सोलापूर : रब्बी हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील खत वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र शासनाच्या खत विक्रीसाठीच्या नवीन एफएफएस प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार २२ ऑक्टोबर २०२६ पासून जिल्ह्यातील सर्व खत विक्रेत्यांना क्यूआर कोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फार्मर आयडी किंवा आधार क्रमांक वापरूनच खतांची खरेदी-विक्री करणे बंधनकारक राहणार आहे. या प्रणालीची सर्व खत विक्रेते व वितरकांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.

रब्बी हंगाम २०२६-२७ च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, कृषी विकास अधिकारी हरी हावळे, मोहिम अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य), खत कंपन्यांचे जिल्हा व्यवस्थापक तसेच सर्व संबंधित पुरवठादार उपस्थित होते.

*२२ ऑक्टोबरपासून नवीन प्रणालीची अंमलबजावणी*

केंद्र शासनाने खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता, साठ्याचे योग्य व्यवस्थापन आणि खत विक्रीची नोंद अधिक प्रभावी करण्यासाठी एफएफएस प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीअंतर्गत क्यूआर कोडचा वापर करून शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी किंवा आधार क्रमांकाच्या आधारे खत विक्रीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व खत विक्रेते, वितरक आणि संबंधित खत कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक तयारी करून प्रणालीची अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

*खत साठा आणि विक्रीतील तफावत आढळल्यास कारवाई*

दि. १९ ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत खत विक्रेत्यांनी प्रत्यक्ष उपलब्ध साठा आणि पॉइंट ऑफ सेल (पीओएस) प्रणालीतील नोंदी यामध्ये कोणतीही तफावत राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रत्यक्ष विक्रीच्या तुलनेत पीओएस प्रणालीतील साठा कमी दाखविणे किंवा प्रत्यक्ष साठ्याची चुकीची नोंद करणे असे प्रकार आढळल्यास संबंधित कृषी सेवा केंद्रधारकांविरुद्ध खत नियंत्रण आदेश, १९८५ आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ यानुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला.

*एफएफएस ॲपबाबत गावपातळीवर जनजागृती व प्रशिक्षण*

एफएफएस ॲपच्या वापराबाबत शेतकऱ्यांना माहिती मिळावी आणि नवीन प्रणालीचा वापर सुलभ व्हावा, यासाठी कृषी विभागातील सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी, खत पुरवठादार कंपन्यांचे जिल्हा प्रतिनिधी आणि कृषी सेवा केंद्रधारक यांनी समन्वयाने काम करावे. गावपातळीवर शेतकऱ्यांना या प्रणालीची माहिती देणे, प्रचार-प्रसिद्धी करणे, आवश्यक मार्गदर्शन करणे तसेच ॲपची कार्यप्रणाली समजावून सांगण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

नवीन प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी खत विक्रेते, वितरक आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक पूर्वतयारी पूर्ण करून शेतकऱ्यांना खत खरेदीच्या प्रक्रियेत अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button