मर्जीतल्या ठेकेदाराकडून चालतेय मनमर्जी; अकलूजच्या शासकीय विश्रामगृहाचे संपूर्ण कामच फर्जी!

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अखत्यारीत असलेल्या अकलूज येथील शासकीय विश्रामगृहाच्या स्वच्छता व दैनंदिन निगा राखण्याचा ठेका सध्या प्रचंड वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे एका मर्जीतल्या ठेकेदाराला हा मक्ता देण्यात आला असून, प्रत्यक्ष सेवा मात्र शून्य असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. स्वच्छतेच्या नावाखाली दरमहा लाखो रुपयांची बिले हडपली जात असून, संपूर्ण विश्रामगृहाला अस्वच्छतेची अवकळा आली आहे.
अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय व प्रशासकीय केंद्र असल्याने येथे मंत्री, वरिष्ठ सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची नियमित ये-जा असते. या व्हीआयपी पाहुण्यांना स्वच्छ व नीटनेटकी सुविधा मिळावी यासाठी विश्रामगृहाची स्वच्छता, बेडशीट बदलणे, सॅनिटायझेशन, परिसर निगा आणि अंतर्गत देखभालीसाठी मोठा निधी खर्च केला जातो. परंतु, प्रत्यक्षात मात्र विश्रामगृहात प्रवेश करताच ठेकेदाराच्या ‘फर्जी’ कामाचे वास्तव उघडे पडते. स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता होत नसल्याने सर्वत्र असह्य दुर्गंधी पसरली असून, फिनाईल किंवा साध्या जंतुनाशकांचाही वापर केला जात नाही. परिसरात धुळीचे व मळकटपणाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आवारात व पायऱ्यांखाली साचलेल्या कचऱ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, निविदेच्या अटी-शर्तींनुसार जेवढे स्वच्छता कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर हजर असणे आवश्यक आहे, त्यातील निम्मेही कर्मचारी कर्तव्यावर नसतात; केवळ कागदावर बोगस हजेरी दाखवून मलिदा लाटला जात आहे.
नियम सांगतो की, स्वच्छता आणि देखभालीची प्रत्यक्ष पाहणी करून, गुणवत्ता समाधानकारक असल्याचा शेरा मिळाल्याशिवाय ठेकेदाराची मासिक बिले अदा करता येत नाहीत. मात्र, अकलूजमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी डोळे झाकून महिन्याला बिले मंजूर करत आहेत. विश्रामगृहात पाय ठेवण्याची चोरी झाली असताना, अधिकारी कोणत्या आधारे या ठेकेदाराचे काम प्रमाणित करतात? मर्जीतल्या ठेकेदाराकडून अधिकाऱ्यांना ‘अर्थपूर्ण’ वाटा पोहोचत असल्याशिवाय इतकी उघड डोळेझाक शक्यच नाही, असा संतप्त आरोप स्थानिक जागरूक नागरिकांमधून केला जात आहे.
शासनाच्या पैशांची होणारी ही उघड लूट आणि विश्रामगृहाची झालेली दुर्दशा आता संतापजनक पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे संबंधित बोगस ठेकेदाराचा परवाना तात्काळ रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकावे, तसेच निकृष्ट सेवेची बिले काढणाऱ्या संबंधित अभियंत्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे. प्रशासनाने तात्काळ सुधारणा न केल्यास अकलूजच्या नागरिकांच्या वतीने शासकीय विश्रामगृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकून तीव्र धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. आता वरिष्ठ अधिकारी या फर्जी कारभारावर कारवाईचा बडगा उचलणार की नेहमीप्रमाणे पांघरूण घालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



