Uncategorized

उजनी साठी रोहित पवार अन् धैर्यशील मोहिते-पाटील मैदानात! उद्या रांजणी चौकात महामार्ग रोखणार; सर्वपक्षीय नेत्यांसह शेतकऱ्यांना आवाहन

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

टेंभुर्णी : उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्याच्या शेतीचे, पिण्याच्या पाण्याचे आणि लाखो नागरिकांच्या जीवनाचे आधारस्थान आहे. या धरणाच्या पाण्यावर आणि परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत प्रस्तावित एआय डेटा सेंटर, फ्लोटिंग सोलार, ग्रीन हायड्रोजन आणि स्मॉल मॉड्युलर रिअॅक्टर प्रकल्पांना विरोध करण्यासाठी उद्या, शनिवार (दि. ३१ ऑक्टोबर) रोजी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भव्य रास्तारोको आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

या आंदोलनाचे विशेष आकर्षण म्हणजे आमदार रोहित पवार आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची उपस्थिती. या दोन्ही नेत्यांसह अनेक मान्यवर राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या आंदोलनाला राजकीय आणि सामाजिक स्तरावर व्यापक पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

उजनी धरणाच्या पाण्याचा प्रश्न हा केवळ एका गावाचा किंवा तालुक्याचा प्रश्न नसून संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या भवितव्याशी जोडलेला आहे. जिल्ह्यातील शेती, पिण्याच्या पाण्याची गरज, उद्योग आणि ग्रामीण अर्थव्यवस्था या सर्व गोष्टी उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहेत.

अशा परिस्थितीत उजनीच्या पाण्याच्या रक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात आमदार रोहित पवार आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा सहभाग महत्त्वपूर्ण मानला जात आहे. दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमुळे या आंदोलनाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

उजनी धरणाच्या परिसरात प्रस्तावित असलेल्या एआय डेटा सेंटर, फ्लोटिंग सोलार, ग्रीन हायड्रोजन आणि स्मॉल मॉड्युलर रिअॅक्टर या प्रकल्पांच्या संभाव्य परिणामांबाबत स्थानिक शेतकरी आणि नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

या प्रकल्पांमुळे उजनीच्या पाण्याच्या वापरावर, शेतीच्या भवितव्यावर आणि परिसरातील पर्यावरणावर काय परिणाम होणार, याबाबत स्पष्टता मिळावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. उजनीच्या पाण्यावर सर्वप्रथम शेतकरी आणि नागरिकांचा हक्क असल्याची भूमिका मांडत या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी जनआंदोलन उभारले जात आहे.

शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रांजणी चौक, ता. माढा येथे हे रास्तारोको आंदोलन होणार आहे.

या आंदोलनात सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिक, शेतकरी बांधव, युवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि पाणीप्रश्नाबाबत जागरूक असलेल्या प्रत्येकाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

उजनीचे पाणी वाचले तरच शेती वाचेल, शेती वाचली तरच शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था टिकेल. त्यामुळे हा लढा कोणत्याही एका पक्षाचा नसून संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या पाणीहक्काचा आणि भविष्यातील पिढ्यांच्या अस्तित्वाचा आहे, अशी भावना आंदोलनाच्या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.

उद्याच्या आंदोलनात आमदार रोहित पवार, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह अन्य मान्यवर नेते आणि शेतकरी कोणती भूमिका मांडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button