अकलूज एस.टी आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे उद्घाटन

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : अकलूज येथील एस.टी. आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय अकलूज येथील प्राचार्य ढवळे सर यांच्या हस्त हस्ते करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश इंधन बचतीचे महत्त्व अधोरेखित करणे तसेच एस.टी. सेवांमध्ये इंधन वापर कार्यक्षमतेने वाढवणे हा आहे.
यावेळी प्राचार्य ढवळे सर यांनी आगारातील कर्मचारी यांना इंधन बचतीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये वाहन चालविण्यासाठी लागणारे इंधन व त्या इंधनावरील प्रक्रिया इंजिन मध्ये कशा प्रकारे होते याबाबत माहिती दिली. तसेच इंधन बचतीमुळे काय फायदे होतात याबाबतही माहिती दिली. त्याच बरोबर इंधन बचत करण्यासाठी काय काय करावे याबाबतही मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आगार व्यवस्थापक प्रमोद शिंदे यांनी आगाराचा एकूण उत्पन्नापैकी 35% खर्च हा इंधनावर होत असून इंधन बचत करून खर्च कमी करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आगारातील वाहतूक नियंत्रक कांतीलाल मदने यांनी केले तर आभार आगारातील कार्यशाळा अधीक्षक राजेंद्र राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी इंधन बचतीमध्ये थेट ज्यांचा सहभाग आहे अशा आगारातील यांत्रिक कर्मचारी, चालक, व वाहक यांचा सन्मान करण्यात आला.