नूतन खासदार आणि आमदारांचा होणार भव्य नागरी सन्मान ; पिरळे येथे जंगी तयारी
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या भव्य नागरी सन्मान सोहळ्याचे पिरळे (ता.माळशिरस) येथे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी जंगी तयारी करण्यात येत असल्याची माहिती संयोजक दादासाहेब शिंदे, नियोजन प्रमुख प्रा.अशोक दडस व प्रा.प्रगती भोसले यांनी दिली.
माळशिरस तालुक्यातील पिरळे येथील प्रशाला क्रीडांगणाच्या मैदानावर सोमवार दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता भव्य नागरी सन्मान सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती म्हणून लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व आमदार उत्तमरावजी जानकर यांचा गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय दलित पँथर चे प्रदेशाध्यक्ष डॉ.घन:श्याम भोसले यांचा विशेष सन्मान होणार आहे.
यावेळी समता माध्यमीक व श्री भिलाईदेवी कनिष्ठ महाविद्यालय, पिरळे, एस.एम.एस.इंग्लीश मेडियम स्कूल, पिरळे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे, अभ्यास केंद्र पिरळे यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी येणार्या पाहुण्यांच्या स्वागताची जबाबदारी चक्रेश्वर हालगी ग्रुप,चाकोरे, बिरूदेव गजी मंडळ पांगरी व टाकेवाडी, मावळा ग्रुप पळसमंडळ, संतोबा गजी मंडळ बांगर्डे, नाथ गजी मंडळ गिरवी, धुळदेव गजी मंडळ मारकडवाडी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
तसेच कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आबारत्न शिक्षण संस्था, पिरळे ग्रामपंचायत पिरळे, विकास सोसायटी पिरळे व ग्रामस्थांचा मोलाचा सहभाग असणार आहे. तालुक्यातील तमाम कार्यकर्त्यांनी तसेच समर्थक आणि हितचिंतकांनी या भव्य सन्मान सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.