पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिन सोहळ्याचे विजयसिंह मोहिते पाटील यांना निमंत्रण ; 4 जानेवारीला पुण्यात होणार भव्य सोहळा
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि समाजाच्या हक्कासाठी लढा देणारे इंजिनीयर पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिन सोहळ्याचे औचित्य साधून राज्यातील विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. या खास सोहळ्यासाठी माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनाही औपचारिक निमंत्रण पाठवण्यात आले आहे. संघाचे उत्तमराव माने शेंडगे यांनी अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर त्यांना सदरचे निमंत्रण दिले.
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांचा चार जानेवारी २०२५ रोजी अमृत महोत्सवी जन्मदिवस आहे त्यासाठी इंजिनीयर विजय घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली “पुरुषोत्तम खेडेकर अमृत महोत्सव गौरव समिती” स्थापन झाली असून त्या समितीने महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे यासाठी आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.
पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा समाजासाठी केलेल्या संघर्षपूर्ण कार्याची महती सांगण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजसुधारणा, शिक्षण व सामाजिक न्यायाच्या दिशेने त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांच्या कार्याचा उहापोह या कार्यक्रमात होणार आहे.
विजयसिंह मोहिते पाटील यांची या सोहळ्याला उपस्थिती मराठा सेवा संघाच्या कार्याला अधिक बळ देईल, असे आयोजकांचे म्हणणे आहे. निमंत्रणा बरोबरच मराठा सेवा संघाचे पदाधिकारी यांनी अमृत महोत्सवी प्रसंगी 2025 या वर्षाची खेडेकर साहेबांचे फोटो असलेली दिनदर्शिका भेट दिली.