आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नातून अकलूजमध्ये उभे राहणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन ; 83 लाखांच्या निधीची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनमोल कार्याची प्रेरणा सातत्याने मिळत रहावी यासाठी अकलूज परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्याची मागणी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून सदर मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सुमारे 83 लाख रूपये उपलब्ध करण्याबाबतच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.
सुमारे 70 हजार लोकसंख्या असलेल्या अकलूज नगरपरिषद हद्दीतील गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यांचा अभ्यास करण्याकरिता वाचनालय अथवा आंबेडकर भवन नाही. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्याच्या 65 वर्षात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यीक, औद्योगिक, घटनात्मक इत्यादी क्षेत्रात असंख्य कामे करून राष्ट्र उभारणीत महत्वपूर्ण योगदान दिले आहे त्याची प्रेरणा नागरिकांना सतत मिळणे आवश्यक आहे यासाठी अकलूज नगरपरिषद हद्दीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भवन बांधण्यात यावे व त्याठिकाणी सुसज्ज वाचनालय व्हावे अशी मागणी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केली आहे.
सदर मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या असल्याने अकलूज परिसरातील नागरीकांतून समाधान व्यक्त होत असतानाच आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.