महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रॅगिंग कायद्याचे ज्ञान आवश्यक – डॉ.आबासाहेब देशमुख
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत विभागीय केंद्र, पुणे अभ्यास केंद्र शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज, महाविद्यालयातील अँटी रॅगिंग समिती व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अँटी रॅगिंग जनजागरण या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
व्याख्यानाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष तथा मुक्त विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्राचे सल्लागार समिती सदस्य डॉ.आबासाहेब देशमुख उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुक्त विद्यापीठ पुणे विभागीय केंद्राचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विश्वासराव गायकवाड उपस्थित होते.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.देशमुख यांनी रॅगिंग म्हणजे काय ? रॅगिंगचे कायदे,रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांना होणारी शिक्षा, रॅगिंगच्या प्रकारामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे. रॅगिंगमुळे मुला-मुलींच्या मध्ये शिक्षणातील निर्माण होणारे अडथळे इत्यादी बाबींवर उदाहरणासहित स्पष्टीकरण दिले. ते पुढे म्हणाले की,रॅगिंग व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये पूर्वी होत असे आज रॅगिंग कायदा अस्तित्वात आल्याने त्याचे विद्यार्थ्यांमध्ये जनजागरण झाल्याने रॅगिंगचे प्रमाण कमी झालेले दिसत आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ.विश्वासराव गायकवाड यांनी रॅगिंग कायदा अस्तित्वात येण्याची पार्श्वभूमी विशद करताना महाविद्यालया मध्ये रॅगिंग होणार नाही यासाठी उपाययोजना करण्या संदर्भात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.शिवप्रसाद टिळेकर यांनी करून दिली.सदरचा कार्यक्रम मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र, पुणे येथील प्रशासकीय शैक्षणिक सल्लागार उत्तमराव जाधव व विभागीय संचालक संतोष वामन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकलूज अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक डॉ. बाळासाहेब मुळीक, महाविद्यालयाचे प्रबंधक राजेंद्र बामणे,कार्यालयीन अधीक्षक युवराज मालुसरे व डॉ. विजयकुमार शिंदे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँटी रॅगिंग समितीचे सचिव डॉ. चंकेश्वर लोंढे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.सज्जन पवार यांनी मानले.