जनावरांचे मांस विक्रीसाठी घेऊन जाणारे वाहन पुन्हा एकदा अकलूज पोलिसांनी पकडले ; 338 किलो मांस सह 3,50,700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, आठवडाभरातील दुसरी घटना
महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : जनावरांचे मांस बेकायदेशीर रित्या विक्री करण्यासाठी निघालेल्या वाहनावर कारवाईचे सत्र अकलूज पोलिसांकडून सुरू असल्याचे पाहायला मिळत असून आठवडी भरात दोन वाहनांवर कारवाई झाल्यामुळे मांस विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार दिनांक 07 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12.45 वा.च्या सुमारास पोलीस हवालदार अमोल बकाल व सरकारी वाहनावरील चालक महादेव जाधव हे चेकिंग नाईट राऊंड करीत असताना पोलीस हवालदार अमोल बकाल यांना गोपनीय बातमीदारामार्फत अकलूज शहरातील पंचशिलनगर येथील होनमाने प्लाॅटजवळ जनावरांची कत्तल करून एका पांढरे रंगाचे इरटीगा वाहनामध्ये जनावरांचे मास विक्री करण्यासाठी घेवुन जात असल्याबाबत माहिती मिळाली.
पोलीस हवालदार अमोल बकाल यांनी पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांना मिळालेली माहिती कळवून त्यांच्या आदेशाने पोलीस हवालदार अमोल बकाल, अबकर तांबोळी, इन्नुस आत्तार असे सरकारी वाहनाने सदर ठिकाणी गेले असता, तेथे एक पांढ-या रंगाची इरटीगा गाडी थांबलेली दिसली. बातमीतील आशयाप्रमाणे संशय आल्याने सदर गाडीकडे जात असताना वाहनाचा चालक अंधाराचा फायदा घेवुन पळून गेला.
सदर इर्टीगा गाडीजवळ जावुन बॅटरीचे उजेडात पाहीले असता, सदर वाहनाचा आर टी ओ नं. एम एच 04 जी ई 5354 असा होता. सदर गाडी तपासण्याकरीता गाडीचे दरवाजे उघडले असता उग्र स्वरूपाचा वास आल्याने बॅटरीचे उजेडात गाडीचे पाठीमागील हौदात जनावरांच्या मांसाचे लहान मोठे आकाराचे तुकडे व त्यावर बर्फ टाकलेला दिसला. त्यावेळी अंधार असल्याने सदरचे वाहन व त्यामधील जनावारांचे मांस पुढील कायदेशीर कार्यवाही करने करीता ताब्यात घेवुन वाहन पोलीस ठाणे आवारात आणुन दोन पंचांना पोलीस हवालदार बकाल यांनी बोलावुन घेवून वाहनामधील जनावारांचे मासाचे वजनकाटा धारका मार्फत वजन काट्यावर मोजमाप केले असता 50,700/- रू. कि. 338 कि.ग्रॅ. जनावरांचे मांसाचे सुटटे असलेले लहान मोठे आकाराचे तुकडे प्रती किलो किं. अंदाजे 150 रू. दराने तसेच 3,00,000/- रू.कि.ची एक पांढ-या रंगाची इर्टीगा गाडी त्याचा आर टी ओ नं एम एच 04 जी ई 5354 असा एकूण 3,50,700 /- रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
सदर इरटीगा वाहन क्रमांक एम एच 04 जी ई 5354 चा चालक हा बेकायदेशीररित्या जनावारांची कत्तल करून ते बेकायदेशीररित्या विक्री करणेकरीता घेवून जात असता पोलीसांची चाहुल लागता सदर वाहनाची चावी काढुन पळुन गेल्याने इरटिगा वाहन क्रमांक एम एच 04 जी ई 5354 चा चालक व त्या संबंधी हित संबंध असणा-या इतर अज्ञात लोकांविरूध्द भारतीय न्यायसंहीता कलम 325, 3(5), सह महाराष्ट्र प्राणी संरंक्षण अधिनियम कलम 5(अ), 5(ब), 5(क), 9 अन्वये चालक पोलीस हवालदार महादेव शिवाजी जाधव यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार अमोल बकाल हे करीत आहेत.