श्री संत नामदेवरायांच्या संजीवन समाधी सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती; पंढरपूर नगरीत 23-24 जुलै रोजी भव्य आयोजन

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या कृपेने आणि संत नामदेवरायांच्या आशीर्वादाने “न भूतो, न भविष्यती” असा एक आगळा वेगळा, अध्यात्मिक आणि धार्मिक उत्सव दिनांक 23 व 24 जुलै (बुधवार व गुरुवार) रोजी श्री क्षेत्र पंढरपूर नगरीत मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे.
या ऐतिहासिक संजीवन समाधी सोहळ्याच्या प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आ. देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित राहणार असून, सोबतच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक आणि भाजपा आध्यात्मिक आघाडीचे राज्य अध्यक्ष तुषार भोसले या सोहळ्यास साक्षीदार राहणार आहेत.
कार्यक्रमाचे संयोजक अध्यक्ष महेश ढवळे (श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंग) यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यक्रमाला येणाऱ्या नामदेव भक्तांसाठी राहण्याची, भोजनाची व प्रसादाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे. महिला वर्गासाठीही विशेष आवाहन करत डॉ. श्रद्धा जवंजाळ (सहसंयोजक व अध्यक्ष – पिंक रेव्होल्यूशन संस्था) यांनी या सोहळ्यात ‘हा कार्यक्रम माझा आहे’ या भावनेने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
या निमित्ताने महाराष्ट्रासह देशभरातून नामदेवरायांच्या विविध समाज घटकांतील भक्त उपस्थित राहणार असून, “परमेश्वरापुढे सर्व लेकरं समान” या भावनेने हा कार्यक्रम प्रत्येकासाठी खुला असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे सहअध्यक्ष ह.भ.प. औसेकर महाराज यांनी या निमित्ताने आधीच भाविकांना साद घालून हा कार्यक्रम अनुभवण्याचे आणि नामदेवरायांचे आशीर्वाद घेण्याचे आवाहन केले आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात अध्यात्म, मानवता, समता आणि एकतेचे महत्व अधोरेखित करताना आयोजकांनी एक सुंदर संदेश दिला –
“अंधार फार झाला, पणती जपून ठेवा“
श्री क्षेत्र पंढरपूर नगरीत “नामदेव-जनाबाई” यांचा जयघोष आणि भक्तीचा महासागर दुमदुमणार हे निश्चित आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



