राजकुमार हिवरकर पाटील यांच्या प्रयत्नातून नातेपुते नगरपंचायतला २ कोटी ९० लाखांचा थेट निधी मंजूर

महर्षि डिजीटल न्यूज
नातेपुते : शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे पुणे-पंढरपूर रोडवरील रस्ता दुभाजकामध्ये स्ट्रीट लाईट व इतर ठिकाणच्या स्ट्रीट लाईटसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नातेपुते नगरपंचायतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून २ कोटी ९० लाखांचा थेट निधी मंजूर झाला असून तसा आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे.
नातेपुते नगरपंचायतीला निधी मिळण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्षा उत्कर्षराणी पलंगे व उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख यांनी पत्राद्वारे दि. २ मार्च रोजी शिवसेना माळशिरस तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्याकडे मागणी केली होती. याबाबत शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्याकडे निधीचे पत्र दिले. त्यांनी तात्काळ आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे ६ मार्च रोजी शिफारस केली. त्यावर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत माळशिरस तालुक्यातील विकास कामांसाठी दि. १० मार्च रोजी बैठकीचे आयोजन केले.
या बैठकीस शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख महावीर देशमुख, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय सावंत, माळशिरस तालुका शिवसेना प्रमुख राजकुमार हिवरकर – पाटील, नातेपुते शहरप्रमुख पोपट शिंदे, स्वीय सहायक प्रवीण लटके हे वर्षा निवासस्थानी उपस्थित होते. यावेळी नातेपुते नगरपंचायतीला नावीन्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी १०० टक्के थेट अनुदान योजनेअंतर्गत निधीबाबत चर्चा झाली.
त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सदर प्रकल्प खर्चाचा १०० टक्के हिस्सा राज्य शासन करणार असल्याचे जाहीर केले व तसे आदेश अर्थ खात्याला दिले. त्यामध्ये पुणे पंढरपूर रस्त्यावरील दुभाजकावर स्ट्रीट लाईट बसवणे, शंकरराव कॉम्प्लेक्स ते सचिन ठोंबरे यांचे घर नातेपुते रोडवर स्ट्रीट लाईट बसवणे, नातेपुते फोंडशिरस रोडवर स्ट्रीट लाईट बसवणे आदी कामांसाठी मंजुरी देण्यात आली. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषदांना निधी वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने नातेपुते नगरपंचायतीसाठी २ कोटी ९० लाख रुपयांचा शासन निर्णय काढला असल्याचे हिवरकर पाटील यांनी सांगितले.