आईच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त १०० आंब्याच्या झाडांची भेट ; मोरे कुटुंबाची अनोखी श्रद्धांजली
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : आईची आठवण आंब्याचा वृक्ष आणि त्याच्या फळाच्या माध्यमातून सदैव स्मरणात राहावी व पर्यावरणाचा समतोल राखावा या उद्देशाने यशवंतनगर येथील मोरे कुटुंबांनी अनोखी श्रद्धांजली अर्पण करत तब्बल १०० आंब्यांच्या रोपट्याचे वाटप केले.
येथील बाळासाहेब चंद्रकांत मोरे यांच्या आई यमुनाबाई चंद्रकांत मोरे यांचे गतवर्षी दिनांक २१ जुलै २०२३ रोजी वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त फुले अर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बौद्धाचार्य विकास जवंजाळ यांनी बुद्ध वंदना घेऊन भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यमुनाबाई चंद्रकांत मोरे यांच्या प्रतिमांचे पूजन केले.
विकासाच्या नावाखाली सध्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. याचा परिणाम पर्यावरणाचा समतोल राखण्यावर होत असून वाढती उष्णता व पावसाचे कमी होत चाललेले प्रमाण याचा विचार करून आईची आठवण जिवंत ठेवण्यासाठी बाळासाहेब मोरे यांनी पुण्यस्मरण दिनानिमित्त उपस्थितांना तब्बल १०० आंब्याच्या रोपट्याचे वाटप केले. यावेळी मोरे परिवारातील सदस्यांसह परिसरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.