शासन प्रशासनाची मेहरबानी ; अकलूज मध्ये पाणीबाणी, ५ दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे अकलूज करांवरसंकट
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : धरणात जलसाठा उपलब्ध असतानाही शासन आणि प्रशासनाच्या कथित मेहरबानीमुळे अकलूज करांवर प्रचंड मोठे कृत्रिम जलसंकट निर्माण झाले असून पाच दिवसात होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली आहे.
याबाबत महर्षी डिजिटल न्यूज ला मिळालेल्या माहितीनुसार, अकलूज शहराबरोबरच यशवंत नगर व संग्राम नगर या गावांसाठी विझोरी येथील तळ्यातून पाणीपुरवठा होतो. या तळ्याचे पाणी साठवन क्षमता 190 दशलक्ष मीटर एवढी असली तरी सध्याच्या घडीला त्यामध्ये गाळ साठल्याने 150 दशलक्ष लिटर एवढाच पाणीसाठा त्या तळ्यात होतो. अकलूज, यशवंत नगर व संग्राम नगर या तीन गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रति दिवस 14 दशलक्ष लिटर एवढे पाणी लागते. एकदा तळे भरले की एक दिवसाआड पाणीपुरवठा केल्यास केवळ पंधरा दिवस पाणी पुरते. चार दिवसाआड पाणीपुरवठा केल्यास 25 दिवस पाणी पुरते.
असे असताना पाटबंधारे विभागाने उन्हाळी आवर्तन चालू असतानाही तब्बल एक महिना तलाव भरून दिला नाही. त्यानंतर दहा मे रोजी शेवटचे पाणी भरून दिले व 15 जून पर्यंत ते टिकवण्याचे आवाहन केले. वास्तविक पाच दिवसात पाणीपुरवठा केला तरी तळ्यातील पाणी 15 जून पर्यंत पुरवणे शक्य नसल्याने आताच कृत्रिम दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.तिन्ही गावातील नागरिक पाण्यासाठी वण वण फिरताना दिसत आहेत.
अकलूज नगरपरिषदेमार्फत चार टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अत्यंत तोडका ठरत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने नागरिकांच्या जीवाशी न खेळता तात्काळ तलाव भरून देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होताना दिसत आहे.
२१२ कोटीची योजना पूर्ण झाल्यास पाणी समस्या निर्माण होणार नाही : आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून अकलूज साठी 212 कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाले असून 77 मैल येथून विझोरी तलावात थेट पाईपलाईन मधून पाणीपुरवठा होणार आहे शिवाय तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार असून यामुळे नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे.