अकलूज बसस्थानकावर मॉकड्रिलचा थरार ; आषाढी वारीसाठी रंगीत तालमीद्वारे सुरक्षा सज्जता तपासली

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अकलूज पोलीस ठाण्याच्या वतीने अकलूज येथील नवीन बस स्थानकावर मॉकड्रिल (रंगीत तालीम) घेण्यात आली. सकाळी ११.०० ते १२.३० वाजेच्या दरम्यान पार पडलेल्या या मॉकड्रिलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याची कल्पित परिस्थिती उभी करून विविध आपत्कालीन यंत्रणांची तात्काळ कृती आणि तयारी याची कसून चाचणी घेण्यात आली.

ही रंगीत तालीम अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, प्रितम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक, तसेच नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.
मॉकड्रिलमध्ये शॉन पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, क्यू.आर.टी. (क्विक रिस्पॉन्स टीम), आर.सी.सी. पथक, फायर ब्रिगेड, अॅम्ब्युलन्स सेवा, सुरक्षा शाखा, वाहतूक शाखा आदी विविध विभागांचे पथक सहभागी झाले होते. बेवारस बॅगमध्ये संशयास्पद वस्तू आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी जागेवर दाखल होऊन आवश्यक ती कारवाई कशी करावी याचे सादरीकरण (डेमोसेशन) करण्यात आले.

या वेळी स.पो.नि. विक्रम साळुंखे, स.पो.नि. योगेश लंगुटे, पो.उ.नि. हणुमंत जरे, महिला पो.उ.नि. करिश्मा वणवे यांच्यासह अकलूज पोलीस ठाण्याचे संपूर्ण स्टाफ उपस्थित होता.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनपेक्षित घटना घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत, असा विश्वास या मॉकड्रिलमधून नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. पोलिसांची दक्षता आणि तत्परता पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.