गांजा साठा प्रकरणी अकलूज पोलिसांची यशस्वी कारवाई; विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून उत्कृष्ट अधिकारी व अंमलदारांचा गौरव

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : महाळुंग (ता. माळशिरस) येथील डांगेवस्ती परिसरात गांजा साठवून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर अकलूज पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईत तब्बल १२९ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या वतीने कारवाईत सहभागी असलेल्या अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
इसम राजु महादेव काळुंखे (रा. डांगेवस्ती, उजनी कॅनॉलजवळ, महाळुंग, ता. माळशिरस) याच्या घरी गांजाचा साठा असल्याची खात्रीशीर माहिती अकलूज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. विक्रम साळुंखे यांना मिळाल्यानंतर तात्काळ वरिष्ठांना माहिती देऊन शासकीय पंच, वजन काटा धारक, फोटोग्राफर, सहा. निबंधक (सक्षम अधिकारी) यांच्यासह पोलिसांचे दोन शासकीय वाहने व एक खाजगी वाहन घेऊन छापा टाकण्यात आला.
कारवाई दरम्यान, काळुंखे याच्या घरात व बाहेरील बाजूस ठेवलेल्या पाच गोण्यांमध्ये खाकी कागदात प्लास्टिक टेपने गुंडाळलेले पाऊच आढळले. या पाऊचमध्ये हिरवट रंगाची पाने, फुले, काड्या व बोंडे असलेला गांजा हा अंमली पदार्थ सापडला. एकूण आठ गोण्यांमध्ये १२९.४२६ किलो गांजा सापडला असून त्याची किंमत २५ लाख ६८ हजार ३४० रुपये इतकी आहे.
या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधे व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत कलम ८(सी), २२(सी) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास स.पो.नि. विक्रम साळुंखे करत आहेत.
या कारवाईत महत्वाची भूमिका बजावलेल्या अधिकारी व अंमलदारांचा विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये स.पो.नि. योगेश लंगुटे, स.पो.नि. गणेश चौधरी, पो.उ.नि. सुधीर खारगे, महिला पो.उ.नि. करिश्मा वणवे, पोहेकॉ. सुहास क्षिरसागर, शिवकुमार मदभावी, विक्रम घाटगे, किशोर गायकवाड, पोना. अजय बुरले, पोकॉ. सोमनाथ माने, मोहन मस्के, रणजित जगताप, प्रविण हिंगणगावकर, चालक पोहेकॉ. महादेव जाधव, चापोहेका. शरद आगलावे यांचा समावेश आहे.
या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या विक्रीस आळा बसून परिसरात पोलिसांप्रती विश्वास वाढला आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.