ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आली जवळ तरीही अवैध धंद्यांना मिळतेय कोणाचे पाठबळ? ; नातेपुते व माळशिरस पोलिसांच्या गाफीलतेवर प्रश्नचिन्ह

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : एकीकडे शासनाने पालखी मार्गावरील मांस विक्री, मद्य विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला असताना दुसरीकडे मात्र या मार्गावरील अवैध धंदे मात्र राजरोसपणे सुरू असल्याचे बोलले जात आहे.
माळशिरस तालुक्यात आगमन होण्यासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला अवघे दोनच दिवस उरले असताना तालुक्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना मात्र कोणताच आळा बसलेला दिसत नाही.
जिल्हा प्रशासन आणि विविध खात्यांची जय्यत तयारी सुरू असताना, दुसरीकडे मटका, अवैध दारू, जुगार यांसारखे गुन्हेगारी कारभार खुलेआम सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे संबंधित पोलिस ठाण्यांची भूमिका मात्र केवळ ‘बघ्याची’ असल्याचा आरोप आता गावकऱ्यांच्या चर्चेचा भाग ठरत आहे.
डीवायएसपी ऍक्टिव्ह मोड मध्ये पण…माळशिरस तालुक्यात असणाऱ्या चार पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा डीवायएसपी पालखीच्या अनुषंगाने अत्यंत तत्पर असून त्यांचे सर्व घडामोडीवर बारकाईने लक्ष असल्याचे दिसून येते मात्र त्यांच्या पाठीमागे स्थानिक पातळीवर खालच्या यंत्रणे करून तेवढी तत्परता दाखवली जात नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे डीवायएसपी रात्रंदिवस घेत असलेल्या कष्टाचे चीज होत नसल्याचे यानिमित्ताने बोलले जाऊ लागले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे माळशिरस तालुक्यात आगमन झाल्यानंतर नातेपुते व माळशिरस ही दोन प्रमुख पोलीस ठाणी या भागात कार्यरत असून, हाच मार्ग पुढे पंढरपूरकडे जातो. या मार्गावर लाखो वारकरी पायी वारी करत असताना, त्याच मार्गालगत सर्रासपणे सुरू असलेले अवैध धंदे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.
स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीवरून असे समजते की, काही ठिकाणी स्थानिक पोलिसांशी ‘सेटिंग’ करूनच हे अवैध धंदे सुरू आहेत. दिवसा शांतता आणि रात्री अड्ड्यांवर गर्दी असे प्रकार सर्रास पाहायला मिळतात. मटका, देशी-विदेशी दारूची अवैध विक्री,जुगार हे सर्व काही अक्षरशः उघडपणे चालू आहे.
अलीकडेच माळशिरस येथील अक्षता मंगल कार्यालयात झालेल्या आम सभेमध्ये आमदार उत्तमराव जानकर आणि आमदार अभिजीत पाटील यांनी थेट उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, “हप्तेखोरीच्या आधारे चालणारे हे धंदे बंद झाले पाहिजेत”. परंतु, या विधानानंतर देखील जमिनीवर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे दिसून येत आहे. उलट या धंद्यांना अधिकच उधान आले आहे.
वारीच्या काळात हजारो वारकरी या भागातून जात असताना, अशी बेकायदेशीर गतीविधी वारकऱ्यांच्या सुरक्षेला आणि सामाजिक शिस्तीला मारक ठरू शकते. महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही क्षणी येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा वेळी पोलिसांनी बंदोबस्तात व्यस्त असण्याऐवजी अशा अड्ड्यांवर छापे टाकणे आणि ते मूळापासून बंद करणे गरजेचे आहे.
माळशिरस आणि नातेपुते भागात सुरू असलेले हे अवैध व्यवहार जिल्हा प्रशासन व पोलीस अधीक्षक कार्यालयासाठी गंभीर चिंता निर्माण करणारे आहेत. स्थानिक पोलीस ठाण्यांची दुर्लक्ष किंवा दुर्भावना यामागे असू शकते, पण त्यामुळे सामान्य जनतेचे व सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण होणे अत्यंत धोकादायक आहे.
वारीच्या आध्यात्मिक उत्साहात सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांच्या मार्गात जर अवैध धंद्यांचा बाजार भरतो, तर हे केवळ कायद्याचे अपयश नाही, तर समाजाच्या मूल्यांचाही अपमान ठरेल. त्यामुळे आता वेळ आहे ती कडक कारवाईची. पोलिसांनी कारवाई न केल्यास जिल्हा प्रशासनाने थेट हस्तक्षेप करून कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.