नातेपुते, माळशिरस पोलिसांची नवी खुबी; मटक्याला अभय, दारूला तंबी…?

महर्षि डिजीटल न्यूज \ सागर खरात
अकलूज : पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणाऱ्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण माळशिरस तालुका सज्ज झाला असताना, या तयारीच्या गदारोळात नातेपुते आणि माळशिरस पोलिसांच्या ‘नव्या खुबी’चा देखील जोरदार बोलबाला आहे. याला कारण म्हणजे दारू विक्रेत्यांना मिळते ‘तंबी’, पण मटक्याच्या अड्ड्यांना मात्र खुलेआम ‘अभय’ मिळत असल्याचे बोलले जात आहे.
सोलापूर जिल्ह्यात पालखीचा प्रवेश माळशिरस तालुक्यातून होत असल्याने संपूर्ण प्रशासन व पोलिस दल सजगतेचा आव आणत असले तरी, प्रत्यक्षात काही वेगळंच चित्र उभं राहतंय. नातेपुते व माळशिरस पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवैध मटका-जुगाराचे धंदे बिनधास्त सुरू असून, त्यांच्यावर कारवाईचा कोणताही ठोस ठपका दिसून येत नाही.
महर्षि डिजीटल न्यूज ने याबाबत यापूर्वी बातमी प्रसिद्ध केल्या नंतर पोलीस यंत्रणेने दारू विक्रेत्यांना तंबी देत त्यांचे अड्डे बंद केल्याची माहिती मिळते आहे. काही ठिकाणी त्यांच्या कारवाईही करण्यात आली आहे. मात्र मटका-जुगाराचे अड्डे मात्र पूर्वीप्रमाणेच भरभराटीत असून, पोलिसांचा हात त्यांच्या खांद्यावर असल्याचेच चित्र वारंवार दिसून येत आहे.
“दारू विक्रेत्यांचा हप्ता छोटा असतो, पण मटक्याचा मोठा!” – हा परिसरात दबक्या आवाजात सतत चर्चेत असलेला संवाद, आज प्रत्यक्षात उघडपणे अनुभवायला मिळतोय.
वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस मॉकड्रिल, वाहतूक नियोजन, बॅरिकेड्स अशा गोष्टींत गुंतले असले तरी गावागावातील सामाजिक प्रदूषण मटकेच्या रूपाने वाढतच चालले आहे.
पिलीव व आसपासच्या भागात मटका-जुगार उघडपणे सुरू असून कोणत्याही स्वरूपाची कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
दारूवर कारवाई स्वागतार्ह असली, तरी मटक्याला माफ करून पोलिसांनी दुजाभाव करणे हे धक्कादायक आहे.
नातेपुते आणि माळशिरस पोलिसांनी पालखीच्या नावाखाली केवळ वरवरची शिस्त न दाखवता समाजाला भेडसावणाऱ्या प्रत्येक अवैध धंद्यावर कारवाई करावी, हीच वारकऱ्यांची आणि नागरिकांची अपेक्षा आहे.