पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांनी घेतला अकलूज पोलीस ठाण्याचा पदभार; कायदा-सुव्यवस्थेला प्राधान्य देणार

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अकलूज पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदाचा पदभार निरज उबाळे यांनी नुकताच स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
निरज उबाळे यांना गुन्हे अन्वेषण आणि भ्रष्टाचार विरोधी कारवाईचा व्यापक अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी पुणे व मुंबई येथे अँटी करप्शन ब्युरो आणि क्राईम ब्रँचसारख्या महत्वाच्या विभागांमध्ये काम पाहिले असून, सांगली येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
“वारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज असून, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, ही विनंती,” असे आवाहन उबाळे यांनी यावेळी केले.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या काळात पोलीस यंत्रणा अधिक कार्यरत राहणार असून, शांतता आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस विभाग सज्ज असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.