अखेर अकलूज नगरपरिषदेसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल ; शेवटच्या दिवशी होणार धावपळ

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : अकलूज नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून एकही अर्ज न आल्यानंतर आज प्रथमच निवडणूक कार्यालयात हालचाल दिसली. महाराष्ट्र विकास सेना पक्षाकडून प्रभाग क्रमांक 13 मधून दत्तात्रय कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर करत प्रक्रियेची औपचारिक सुरुवात केली.
10 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी कालपर्यंत कोणताही अर्ज दाखल न झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. मात्र आज दाखल झालेल्या पहिल्या उमेदवारी अर्जामुळे निवडणूक वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे.
नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने विविध पक्ष आणि स्वतंत्र उमेदवार आपल्या रणनीती ठरवण्यात व्यस्त असून अनेकांनी अर्ज, कागदपत्रे आणि प्रचाराची प्राथमिक तयारी सुरू केली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर असून, अंतिम दिवस जवळ येत असल्याने सोमवारी अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अकलूज नगरपरिषद निवडणुकीत कोण कोण मैदानात उतरणार, कोणते नवीन चेहरे पुढे येणार आणि कोणत्या प्रभागात कोणती चुरस रंगणार, याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता वाढत आहे.



