पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर चोरट्याचा ८.८५ लाखांवर डल्ला ; अकलूज पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : शहराच्या मध्यवर्ती भागातील आयसीआयसीआय बँकेसमोर दुपारी उघड्यावर घडलेल्या लाखोंच्या चोरीच्या घटनेने अकलूज शहर हादरले आहे. विशेष म्हणजे ही घटना अकलूज पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर, नव्या बसस्थानकासमोर उघड्यावर घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मनिषा रविंद्र गवळी (रा. सुमित्रानगर, यशवंतनगर, ता. माळशिरस) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्या सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्रात क्षेत्र समन्वयक म्हणून कार्यरत असून बचत गटाच्या महिलांसाठी घेतलेला १० लाखांचा बँक लोन व्यवहार पूर्ण करून परतत असताना ही घटना घडली.
फिर्यादी सांगतात की, बँकेतील आवश्यक रक्कम भरण्याचे व्यवहार पूर्ण करून त्या व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकूण ८ लाख ७५ हजार रुपये रोख व मोबाईल (किंमत १० हजार रुपये) असलेली बॅग स्कुटीवर ठेवली होती. त्याचवेळी अज्ञात चोरट्याने पाठीमागून येत ही बॅग हिसकावून पोबारा केला. घटनास्थळी गर्दी असूनही चोरटा पसार झाला. त्यानंतर तक्रारदार व त्यांच्या पतीसह नातेवाईकांनी शहरात विविध ठिकाणी शोध घेतला, मात्र चोरटा व बॅग मिळून आली नाही.
अकलूजसारख्या गजबजलेल्या ठिकाणी, पोलीस ठाण्याच्या शेजारीच घडलेल्या या डल्ल्यामुळे नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे. शहरात सतत वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांवर पोलिसांचा प्रभाव दिसून येत नसल्याची चर्चा सुरू आहे. दिवसाढवळ्या एवढ्या मोठ्या रकमेची चोरी झाल्याने, पोलिसांची गस्त, सीसीटीव्ही निगराणी, तात्काळ प्रतिसाद व्यवस्था यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
अकलूज शहरात नित्यनेमाने वाहतूक कोंडी, बसस्थानक परिसरातील गर्दी, तसेच पोलिस ठाण्याच्या जवळच असलेल्या या भागात गस्त पोलीस कुठे होते? असा सवाल नागरिक विचारत आहेत. मोठ्या रकमेची हालचाल असताना बँकेबाहेर कोणतीही सुरक्षा किंवा चौकशी न होणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे मत आहे.
पोलिस ठाण्याच्या नजीकच अशा घटना घडत असल्याने सामान्य नागरिक सुरक्षित आहेत का? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. दिवसाढवळ्या लाखोंची बॅग हिसकावणारे चोरटे एवढे निर्भय झालेत तर ग्रामीण व कमी वर्दळीच्या भागातील स्थिती काय असेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
घटनेनंतर फिर्यादीने त्वरित पोलीस ठाण्यात धाव घेतली असली तरी पोलिसांची कारवाई, तपास आणि संशयितांचा शोध अद्याप प्रतीक्षेत आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याचा दावा पोलिसांनी केला असला तरी अजून ठोस धागेदोरे समोर आलेले नाहीत.
अकलूजसारख्या मोठ्या व्यापारी व शैक्षणिक शहरात दिवसाढवळ्या एवढ्या मोठ्या रकमेला चोरटे हात घालतात आणि पोलिसांना धड माहितीही मिळत नाही, हे निश्चितच धक्कादायक आहे.
गुन्हेगारांचे धाडस वाढते आहे की पोलिसांची कार्यक्षमता कमी होते आहे? असा प्रश्न उपस्थित होतो.
या घटनेने अकलूज पोलिसांच्या गस्त, निगराणी व कायदा सुव्यवस्था यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.



