Latest News

माळशिरस तालुक्यात भाजपामध्ये धुसफूस ? ; सत्ताकेंद्र होऊ इच्छिणार्‍या माजी आमदार राम सातपुते यांच्यावर अंतर्गत नाराजीचा सूर

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात

अकलूज : माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षामध्ये (भाजपा) अंतर्गत नाराजीचा सूर वाढत चालला आहे. माजी आमदार राम सातपुते हे स्थानिक राजकारणात सत्ताकेंद्र बनण्याचा प्रयत्न करत असले तरी, त्यांच्या कार्यशैलीबद्दल पक्षातील वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राम सातपुते यांच्या वर्तणुकीवर अनेकांनी प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. त्यांची वर्तणूक तालुक्याच्या सुसंस्कृत व सभ्य राजकारणाला तिलांजली देणारी असल्याचे पक्षांतीलच नेते बोलून दाखवत आहेत. त्यामुळे पक्षातीलच एका गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. सातपुते जुन्या जाणत्या पदाधिकार्‍यांना विश्वासात घेत नाहीत आणि स्वतःचा स्वतंत्र गट तयार करत असल्याचा आरोप पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी केला आहे.

माळशिरस तालुक्यातील काही भाजप नेते सातपुते यांच्यावर पक्षासाठी नव्हे, तर स्वतःच्या सत्ताकेंद्रासाठी काम करत असल्याचा आरोप करत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही ज्येष्ठ पदाधिकार्‍यांनीही त्यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

या अंतर्गत गटबाजीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही स्थानिक नेत्यांनी राम सातपुते यांना पर्याय म्हणून माळशिरस तालुक्यातील अन्य सक्षम नेतृत्वाला संधी देण्याची मागणी केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने या वादाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास, पक्षाची निवडणूक रणनीती आणि एकसंघता धोक्यात येऊ शकते अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!