माजी आमदार राम सातपुते बॅकफूटवर? ; भाजपतील अंतर्गत कलह आणि रणजितसिंह यांना आलेले प्रदेशाध्यक्षांचे पत्र कारण ठरत असल्याची चर्चा

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षातील अंतर्गत राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. एकसंध असलेल्या भाजपामध्ये माजी आमदार राम सातपुते यांच्यामुळे दोन गट पडले असल्याची चर्चा उघडपणे होताना दिसत आहे. त्यातच सातपुते यांच्याकडून सातत्याने कारवाईची मागणी करण्यात येणाऱ्या आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सार्वजनिकरित्या कार्याचे कौतुक केल्याचे पत्र पाठवल्यामुळे माजी आमदार राम सातपुते काहीसे बॅकफूट वर गेल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील एक प्रभावी नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पक्षासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. माढा लोकसभेतून खासदार, माळशिरस विधानसभेतून आमदार तसेच जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवण्याबरोबरच विविध स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपाला यश मिळवून देण्यात रणजितसिंह मोहिते पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय ताकदीचा अंदाज भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या गौरवोद्गारांवरून येतो.
शिवाय सोलापूर जिल्हा हा मोहिते पाटील यांचा पारंपरिक गड असल्याने भाजपाला या भागात फायदा होऊ शकतो तो यापूर्वीही झालेला आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा राजकीय वारसा असल्याने रणजितसिंह यांना नेतृत्वाचा मोठा अनुभव आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची स्तुती केल्याने त्यांचे पक्षातील स्थान अधिक मजबूत झाले आहे.
याउलट माजी आमदार राम सातपुते हे भाजपातील आक्रमक आणि युवा नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी थेट आणि मर्यादा सोडून टीका केली होती. त्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून मोहिते पाटील यांना मिळालेला पाठिंबा पाहता सातपुते यांची स्थिती कमकुवत झाली असल्याचे बोलले जात आहे.
सातपुते यांचे मोहिते पाटील यांच्यावर टीकास्त्र वरिष्ठ नेत्यांना मान्य नसल्याने. त्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली जात असून माळशिरस तालुक्यातील भाजपाच्या काही गटांनी सातपुते यांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याची चर्चा उघडपणे होऊ लागली आहे. शिवाय ज्यांनी राम सातपुते यांना माळशिरस तालुक्यात आणले त्यांनाच ते विसरल्याने त्यांच्याविषयीच्या प्रचंड नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे.
एकंदरीतच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या कार्याची प्रशंसा केल्यानंतर पक्षातील समीकरणे बदलली आहेत. राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्यावर केलेली टीका त्यांच्यावरच उलटली आहे. त्यामुळे सातपुते बॅकफूटवर गेले आहेत, आणि भाजपाच्या स्थानिक पातळीवरील गटबाजी तीव्र झाली आहे. भाजपाने योग्य वेळी निर्णय घेतला नाही, तर माळशिरस आणि माढा मतदारसंघात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पक्षाचे नुकसान होऊ नये यासाठी वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी या निमित्ताने होताना दिसत आहे.