Latest News

आनंदाची बातमी | अकलूज उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा ; नव्या इमारतीसाठी जागा हस्तांतरण करण्याचा आदेश 

महर्षि डिजीटल न्यूज 

अकलूज : अकलूज उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शासनाने नव्या १०० खाटांच्या इमारतीसाठी जागा आरोग्य विभागाला हस्तांतरण करण्याचा आदेश जारी केला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी हा आदेश काढला असून, गट क्रमांक ८४/६/२/ब, (क्रीडा संकुल च्या पाठीमागे) क्षेत्रफळ ० हेक्टर ५६ आर इतकी शासकीय जमीन आरोग्य विभागाला देण्यात आली आहे.

सध्या कार्यरत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाची जागा अपुरी पडत असल्याने रुग्णसेवेत अनेक अडचणी निर्माण होत होत्या. नव्या इमारतीच्या उभारणीनंतर रुग्णालयाची क्षमता वाढून आधुनिक वैद्यकीय सुविधा, विभागीय विस्तार आणि अधिक खाटांची उपलब्धता निर्माण होणार आहे. या निर्णयामुळे अकलूज आणि परिसरातील हजारो रुग्णांना थेट लाभ होऊन, मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज कमी होईल.

या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अकलूज उपजिल्हा रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठी हे पाऊल मैलाचा दगड ठरणार असून, परिसरात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्याच्या दिशेने महत्त्वाची वाटचाल सुरू झाली आहे.

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी या प्रकल्पासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून जमीन हस्तांतरणाचा निर्णय घडवून आणला. त्यांच्या प्रयत्नांचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करत कौतुक व्यक्त केले आहे.

नवीन इमारतीच्या बांधकामाची पुढील प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, अकलूज उपजिल्हा रुग्णालय परिसरातील आरोग्य सेवांचे एक प्रमुख केंद्र ठरण्याच्या दिशेने वाटचाल करेल असे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर बापू ओवाळ यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!