Latest News

पाण्याचा पाट काढण्याच्या वादातून दलित कुटुंबाला मारहाण; जातीवाचक शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग, तलाठ्यासह तिघांवर गुन्हा दाखल!

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

नातेपुते : माळशिरस तालुक्यातील दहीगाव येथे शेतातून पाण्याचा पाट काढण्याच्या किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर वादात झाले असून, गावातील दलित कुटुंबाला लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी क्रूरपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शासकीय पदाचा गैरवापर करून जातीवाचक शिवीगाळ करणे, दमदाटी करणे आणि वाद सोडवण्यास आलेल्या सुनेचा विनयभंग केल्याप्रकरणी दहीगावचे तलाठी समाधान शिवदास पाटील, दत्तात्रय यादव आणि अन्य तीन अनोळखी इसमांविरुद्ध नातेपुते पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात श्रीमती निला महादेव अवघडे (वय ५१, रा. दलितवस्ती, दहीगाव) यांनी नातेपुते पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, १४ मे २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी निला अवघडे आणि त्यांची सून अंजली घरामध्ये काम करत होत्या. दरम्यान, घराबाहेरून “बाई तुम्ही बाहेर या,” असा आवाज आल्याने त्या दोन्ही महिला बाहेर आल्या. त्यावेळी घराबाहेर दहीगावचे तलाठी समाधान शिवदास पाटील, दत्तात्रय यादव आणि इतर तीन अनोळखी व्यक्ती उभे होते. फिर्यादीने त्यांना येण्याचे कारण विचारले असता, तलाठी पाटील म्हणाले की, “आमचे पाहुणे दत्तात्रय यादव यांच्या पपईचे पीक जळत आहे. तुमच्या घरासमोरील पाटाने पाणी घेऊन जाऊ द्या, नाहीतर आम्ही तुमचे कंपाउंड पाडून पाणी नेऊ.”

यावर फिर्यादीने, “पाटाने पाणी नेल्यास घराच्या भिंतीजवळून पाणी जाऊन भिंत पडण्याचा धोका निर्माण होईल,” असे सांगत जुन्या पाटाने पाणी नेण्याची विनंती केली.

फिर्यादीच्या या उत्तराने संतप्त झालेल्या तलाठी समाधान पाटील यांनी फिर्यादीच्या सातबारा उताऱ्यातील नोंदींचा उल्लेख करत, “मी स्वतः तुमच्या उताऱ्यातील नोंदी फकड्याने कमी केल्या आहेत. तुम्ही आमचे काही बिघडवू शकत नाही. तुम्हाला येथे राहण्याचा आणि बोलण्याचा अधिकार नाही,” असे म्हणत थेट जातीवाचक आणि अत्यंत अपमानास्पद वक्तव्य केले. तसेच, “तुम्हाला महारा-मांगाला कशाला पाणी लागते, मांगा-महारांना माझा इंगा दाखवतो, मीच या गावचा तलाठी आहे,” असे म्हणत फिर्यादीला धक्काबुक्की केली.

हा वाद पाहून फिर्यादीचा मुलगा विकास तेथे धावत आला आणि काय झाले अशी विचारणा करू लागला. त्यावेळी तलाठी पाटील, दत्तात्रय यादव आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी विकासला शर्ट धरून खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

हा गंभीर प्रकार पाहून सून अंजली ही पती विकास आणि सासूला सोडवण्यासाठी मध्ये पडली. त्यावेळी आरोपी तलाठी समाधान पाटील याने अंजलीचा उजवा हात धरून ओढला आणि तिचा विनयभंग केला. तसेच तिचा हात पिरगाळून, “मी जिवंत असेपर्यंत तुमच्या उताऱ्यावर नावे कधीही लागू देणार नाही. ही जमीन आमचे पाहुणे दत्तात्रय यादव यांना विकून टाका,” अशी धमकी देत अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली.

हा गोधळ सुरू असतानाच दहीगावच्या सरपंच सोनम खिल्लारे यांचे पती रणजित खिल्लारे हे त्या ठिकाणी आले. त्यांनी मध्यस्थी करत आरोपींच्या तावडीतून अवघडे कुटुंबाची सुटका केली. जाता-जाता आरोपींनी, “तुम्ही जर पोलिसांत गेलात तर तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून तुम्हाला त्यात अडकवून टाकू,” अशी धमकी दिली.

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्यांवर नातेपुते येथील सरकारी दवाखान्यात उपचार करण्यात आले असून, त्यानंतर पीडित कुटुंबाने नातेपुते पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून नातेपुते पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ७४ (महिलांच्या विनयभंगाशी संबंधित), ११५(२) (स्वेच्छेने दुखापत करणे), ३५२(शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे), ३५१(२) (गुन्हेगारी धमकी), ३(५) (समान हेतूने केलेले कृत्य) आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम (ॲट्रॉसिटी ॲक्ट), १९८९ च्या कलम ३(१)(r), ३(१)(s), ३(१)(w)(ii) आणि ३(२)(va) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक (Dy. SP) संतोष शिवाजी वाळके यांच्याकडे सोपवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास करत आहेत. शासकीय पदावर असलेल्या व्यक्तीनेच अशा प्रकारे कायदा हातात घेतल्याने संपूर्ण माळशिरस तालुक्यात या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!