माळशिरसच्या वस्तीगृहासाठी मंत्रालयात मोठा निर्णय ; आ.उत्तमराव जानकर यांचा पाठपुरावा

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : माळशिरस तालुक्यातील अनुसूचित जाती, जमाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मुलांचे व मुलींचे शासकीय वस्तीगृह उभारण्याच्या मागणीसंदर्भात महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना १५ दिवसांच्या आत जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
या बैठकीस माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तमराव जानकर उपस्थित होते. त्यांनी ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भेडसावणाऱ्या अडचणींचा आढावा घेत स्वतंत्र शासकीय वस्तीगृहाची गरज सविस्तरपणे मांडली.
यावेळी आमदार जानकर यांनी माळशिरस शहरातील महिला व बालविकास विभागाच्या ताब्यात असलेली, सरटिफाई हायस्कूललगतची शासकीय जागा मुलांचे व मुलींचे स्वतंत्र शासकीय वस्तीगृह उभारण्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी मंत्री शिरसाट यांच्याकडे केली.
या मागणीची दखल घेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना १५ दिवसांच्या आत जागेबाबतचा प्रस्ताव तयार करून सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच हा विषय लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत स्वतंत्र बैठक घेऊन अंतिम निर्णय करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
बैठकीस महिला व बालविकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, समाजकल्याण आयुक्तालय तसेच मंत्रालयातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार निवासी व शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार उत्तमराव जानकर सातत्याने पाठपुरावा करत असून, या बैठकीमुळे स्वतंत्र शासकीय वस्तीगृह उभारणीच्या प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



