Latest News

समतेचा संदेश घेऊन भीमाकोरेगाव ते पंढरपूर ऐतिहासिक धम्मयात्रेला १२ जुलैपासून प्रारंभ

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : सामाजिक समता, बंधुता, मानवता आणि भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने भीमाकोरेगाव ते पंढरपूर धम्मयात्रा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. १२ ते २३ जुलै २०२६ या कालावधीत होणारी ही १२ दिवसांची पदयात्रा पूज्यनीय भिक्खू ज्ञानज्योती महास्थवीर व भिक्खू संघ यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार असून, राज्यभरातील धम्मप्रेमी, भिक्खू, उपासक-उपासिका तसेच बहुजन समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या पदयात्रेचा शुभारंभ रविवार, दि. १२ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक क्रांतिस्तंभ, भीमाकोरेगाव येथून होणार आहे. तर गुरुवार, दि. २३ जुलै रोजी पंढरपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे धम्म रॅलीद्वारे पदयात्रेचा समारोप करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रवासादरम्यान दररोज धम्मप्रवचने, धम्मचर्चा, भोजन व मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.

आयोजकांच्या मते, पंढरपूर हे केवळ धार्मिक स्थळ नसून बहुजन समाजाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि स्वाभिमानाच्या वारशाशी जोडलेले महत्त्वाचे केंद्र आहे. भगवान बुद्ध, संत परंपरा आणि समतेच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या भूमीशी समाजाचा ऐतिहासिक संबंध अधोरेखित करण्यासाठी या धम्मयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

भगवान गौतम बुद्धांनी दिलेला समता, करुणा आणि मानवतेचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरत आहे. जात-पात, अंधश्रद्धा, अन्याय आणि सामाजिक विषमता दूर करून समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी बुद्धांच्या विचारांचा स्वीकार करणे ही काळाची गरज असल्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या मूल्यांचा प्रसार करण्याचे कार्यही या पदयात्रेतून केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, ही धम्मयात्रा मागील बारा वर्षांपासून सातत्याने आयोजित केली जात आहे.

पदयात्रेचे दिवसनिहाय वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

  • १२ जुलै (रविवार) – भीमाकोरेगाव ते केसनंद (मुक्काम)
  • १३ जुलै (सोमवार) – कोळवडी, उरुळी, नायगाव मार्गे उरुळीकांचन (मुक्काम)
  • १४ जुलै (मंगळवार) – सरेहपूर, कासुर्डी मार्गे यवत (मुक्काम)
  • १५ जुलै (बुधवार) – भांडगाव, गोपाळवाडी, वरवंड मार्गे पाटस (मुक्काम)
  • १६ जुलै (गुरुवार) – पांढरेवाडी, कुरकुंभ मार्गे रावणगाव (भीमनगर) (मुक्काम)
  • १७ जुलै (शुक्रवार) – खडकी, भिगवण मार्गे भाळवडी (मुक्काम)
  • १८ जुलै (शनिवार) – जळऊण क्र. २, पळसदेव मार्गे लोंढेवस्ती (भीमनगर) (मुक्काम)
  • १९ जुलै (रविवार) – गळंडवाडी, इंदापूर मार्गे वडापुरी (मुक्काम)
  • २० जुलै (सोमवार) – सुरवड, बावडा मार्गे अकलूज (मुक्काम)
  • २१ जुलै (मंगळवार) – खंडाळी, वेळापूर मार्गे बोंडले (मुक्काम)
  • २२ जुलै (बुधवार) – वाडी कुरोली, भंडीशेगाव मार्गे वाखरी (मुक्काम)
  • २३ जुलै (गुरुवार) – वाखरी ते पंढरपूर धम्म रॅली; डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे समारोप.

यात्रेदरम्यान विविध ठिकाणी धम्मप्रवचने, समाजप्रबोधन, बौद्ध धम्माविषयी मार्गदर्शन तसेच सामाजिक सलोखा आणि समतेचा संदेश दिला जाणार आहे. समाजात बंधुभाव वाढविणे, युवकांमध्ये सामाजिक जाणिवा निर्माण करणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे हा या धम्मयात्रेचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

“सामाजिक क्रांती अभियानात सर्व बहुजन समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन धम्मयात्रा पदयात्रा संयोजन समिती व अखिल भारतीय भिक्खू संघ, ताडोबा अभयारण्य, चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. “भवतु सब्ब मंगलम्” या मंगलकामनेसह समाजातील सर्व घटकांनी या ऐतिहासिक धम्मयात्रेत सहभागी व्हावे, असेही आयोजकांनी आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!