Latest News

बायपास रोडला १७ कोटींचे सुशोभीकरण ; रस्ता रुंद होणार, आकर्षक लाईट्स व फुटपाथची सुविधा, शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्याकडून पाहणी

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : अकलूज शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या केंद्रीय रस्ता निधी (CRF) अंतर्गत सुरू असलेल्या बायपास रोडच्या सुशोभीकरण व विकासकामांची पाहणी गटनेते तथा अकलूज नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी केली. जयसिंह चौक ते महर्षी चौक ते प्रतापसिंह चौक या मार्गावरील सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेची व प्रगतीची त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.

यावेळी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी विकासकामे दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व ठेकेदारांना दिल्या. नागरिकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ, आकर्षक आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला.

यावेळी बोलताना शिवतेजसिंह मोहिते पाटील म्हणाले की, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या विकासकामासाठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत विद्यमान रस्ता दोन मीटरने रुंद करण्यात येणार असून, अडीच मीटर रुंदीचा आधुनिक फुटपाथ उभारण्यात येणार आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक विद्युत दिवे बसविण्यात येणार असून, वृक्षांचे रोपणही होणार आहे, ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिकांना बसण्यासाठी बाकांची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या विकासकामांमुळे संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण होऊन अकलूज शहराच्या सौंदर्यात मोलाची भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच काम सुरू असताना वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. काम लवकरात लवकर आणि उच्च दर्जाचे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व ठेकेदारांना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या पाहणी दौऱ्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दिनेश ढोपरे, लालासाहेब अडगळे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!