माळशिरससाठी १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय, ट्रॉमा सेंटर ; गरुड बंगल्यातील भेटीत आ.उत्तमराव जानकर यांची आरोग्य मंत्र्याकडे मागणी

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. ना. श्री. प्रकाशजी आबिटकर यांनी आज वेळापूर येथील गरुड बंगल्यावर आमदार मा. श्री. उत्तमराव जानकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार जानकर यांनी मंत्री आबिटकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
भेटीदरम्यान आमदार उत्तमराव जानकर यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातील आरोग्य विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्री आबिटकर यांना सविस्तर निवेदन सादर केले. मतदारसंघातील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनात माळशिरस येथे १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर उभारणे, अकलूज उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणे, सीटी स्कॅन (CT Scan) मशीन मंजूर करणे, माळशिरस ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस केंद्र सुरू करणे, पिलीव, वेळापूर आणि माळीनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन करणे तसेच सर्व रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमधील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली.
माळशिरस तालुक्यातील नागरिकांना अधिक सक्षम, दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी आमदार उत्तमराव जानकर सातत्याने पाठपुरावा करत असून जनतेच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक प्रश्न शासन स्तरावर प्रभावीपणे मांडण्याचा त्यांचा निर्धार कायम असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.



