Latest News

महिन्याला ५ टक्के परताव्याचे आमिष; ‘लक्ष्मीकृपा’चा म्होरक्या अखेर पोलिसांच्या ताब्यात; 10 दिवसांची पोलिस कोठडी 

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात

अकलूज : महिन्याला ५ टक्के परतावा आणि गुंतवलेल्या रकमेवर आकर्षक नफ्याचे आमिष दाखवत अनेक गुंतवणूकदारांची ६१ लाख ३६ हजार ६९० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अकलूज पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सोमनाथ साधू खराडे व चंद्रकला सोमनाथ खराडे यांना न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, अन्य आरोपींच्या तपासालाही वेग आला आहे.

याबाबत यशवंतनगर येथील रवी तात्यासाहेब शिंदे यांनी अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, २१ एप्रिल २०२५ ते २० मार्च २०२६ या कालावधीत आरोपींनी ‘लक्ष्मीकृपा अर्बन निधी लिमिटेड’ या संस्थेच्या माध्यमातून गुंतवणुकीवर दरमहा ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीसह अनेकांकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा करून घेतली.

फिर्यादीने ६ लाख ६० हजार रुपये गुंतवले होते. त्यापैकी काही रक्कम परतावा म्हणून मिळाली असली, तरी ३ लाख २४ हजार रुपये परत करण्यात आले नाहीत. तपासादरम्यान इतर गुंतवणूकदारांनाही अशाच प्रकारे फसवण्यात आल्याचे समोर आले असून, एकूण फसवणुकीची रक्कम ६१ लाख ३६ हजार ६९० रुपये इतकी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात सोमनाथ साधू खराडे, चंद्रकला सोमनाथ खराडे, आनंदराव हरीबा मगर, मनीषा आनंदराव मगर, संतोष पांडुरंग निकम, सोनाली संतोष निकम, विशाल कुमार पवार, वर्षा विशाल पवार, विलास रामभाऊ लायघे, रेखा विलास लायघे आणि संग्राम शाहाजी गोडसे यांच्यासह इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकलूज पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३१८(४), ३१६(२), ३१६(५), ३(५) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण अधिनियम, १९९९ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तपासात आरोपींच्या ‘लक्ष्मीकृपा अर्बन निधी लिमिटेड’, ‘लक्ष्मीकृपा अॅग्रीकल्चर’ आणि ‘लक्ष्मीकृपा कन्सल्टन्सी’ या कंपन्यांची माहिती, बँक खात्यांचे व्यवहार आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी सुरू असून, आणखी काही गुंतवणूकदार पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, अकलूज पोलिसांनी आरोपी क्रमांक १, २ आणि १० यांना अटक केली असून, त्यापैकी सोमनाथ खराडे व चंद्रकला खराडे यांना न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या आर्थिक घोटाळ्याचा तपास पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!