Latest News

गोपनीय माहितीच्या आधारे सापळा ; तिघांकडून 3 देशी पिस्टल, 6 जिवंत काडतुसे जप्त

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तीन देशी बनावटीची पिस्टले, सहा जिवंत काडतुसे आणि चार मोबाईल असा एकूण 2 लाख 46 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून शस्त्र पुरवठ्याच्या साखळीचा तपास सुरू आहे.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रधारकांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक कार्यरत होते.

दरम्यान, गोपनीय बातमीदारामार्फत हातीद (ता. सांगोला) येथे सांगोला–मिरज महामार्गावरील पुलाजवळ तीन जण अवैधरित्या पिस्टल घेऊन उभे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक अमित बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकून तिघांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अवधूत सुभाष केंगार (वय 27, रा. कोळा, ता. सांगोला), हर्षवर्धन उर्फ बालाजी नामदेव ऐवळे (वय 24, रा. किडेभिसरी, ता. सांगोला) आणि आबा धोंडीराम नरळे (वय 29, रा. जुनोनी, ता. सांगोला) अशी आहेत.

आरोपींची झडती घेतली असता अवधूत केंगार व हर्षवर्धन ऐवळे यांच्या ताब्यातून प्रत्येकी एक देशी बनावटीचे पिस्टल, चार जिवंत काडतुसे आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले. शस्त्र बाळगण्याचा परवाना विचारला असता आरोपी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ही दोन्ही पिस्टले व काडतुसे दोन वर्षांपूर्वी महेबूब (रा. मध्यप्रदेश) याच्याकडून घेतल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यानुसार सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 623/2026 अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम, 1959 च्या कलम 3 व 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयाने आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कालावधीत तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी दिलीप शिवाजी अलदर (वय 46, रा. मदने वस्ती, कोळे, ता. सांगोला) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून आणखी एक देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे व मोबाईल असा 60 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत एकूण तीन देशी बनावटीची पिस्टले, सहा जिवंत काडतुसे आणि चार मोबाईल असा 2 लाख 46 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, शस्त्र पुरवठ्यामागील साखळीचा तपास सुरू आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक अमित बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि सांगोला पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!