सत्ताधाऱ्यांचा दबाव, अधिकाऱ्यांची मुजोरी अन् ‘त्या’ कथित क्लिपमागचं वास्तव काय?

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : सध्या सोशल मीडियावर एका कथित ऑडिओ क्लिपची जोरदार चर्चा सुरू आहे. माळशिरस येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागातील एका अधिकाऱ्याला खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप या क्लिपच्या माध्यमातून केला जात आहे. या क्लिपची सत्यता अद्याप पूर्णपणे पडताळली गेलेली नाही, किंवा संबंधित दोघांकडूनही याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. परंतु, या कथित क्लिपच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेतील एक अत्यंत गंभीर आणि विदारक वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. मूळ प्रश्न असा पडतो की, लोकप्रतिनिधींवर अशी वेळ का येते?
सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना दिली जाणारी वागणूक पाहता, लोकशाहीच्या मूल्यांची पायमल्ली होताना दिसत आहे. मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी वाटप असो, अथवा विरोधकांनी मांडलेल्या जनतेच्या समस्या असोत; सत्ताधाऱ्यांकडून त्यांना जाणीवपूर्वक डावलले जाते. हेच चित्र दुर्दैवाने प्रशासकीय पातळीवरही पाहायला मिळत आहे. राज्य पातळीवरील सनदी अधिकाऱ्यांपासून ते स्थानिक पातळीवरील छोट्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच जण सत्ताधाऱ्यांच्या दबावापुढे पूर्णपणे हतबल झाले आहेत.
अतिशय गंभीर बाब म्हणजे, सत्तेत असलेल्या पक्षाच्या माजी आमदारांना, माजी खासदारांना किंवा साध्या पदाधिकाऱ्यांना जेवढे महत्त्व दिले जाते, त्यांची कामे प्रशासनात ज्या तत्परतेने मार्गी लावली जातात, ते पाहता अधिकारी वर्ग सत्ताधाऱ्यांपुढे नेहमीच ‘जी हुजूर’ करताना दिसतो. याउलट, जनतेने निवडून दिलेल्या विद्यमान विरोधी आमदार-खासदारांच्या बाबतीत पूर्णपणे विरोधी आणि दुजाभावाची भूमिका घेतली जाते. विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी मिळत नाही, हे आता लपून राहिलेले नाही. शिवाय, अधिकारी वर्गही या लोकप्रतिनिधींना जुमानत नाही, त्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवतो, हे सर्वश्रुत आहे. जेव्हा कायदेशीर चौकटीत आणि विनंती करूनही अधिकारी ऐकत नाहीत, तेव्हा लोकप्रतिनिधींकडून आक्रमक भाषा वापरली जाणे स्वाभाविक ठरते.
ज्या जिल्हा परिषद उपअभियंत्यासोबत (इस्माईल मुलाणी) खासदारांचा वाद झाल्याचे सांगितले जात आहे, त्या अधिकाऱ्याची माळशिरस तालुक्यातील कारकीर्द अत्यंत वादग्रस्त आणि भ्रष्ट राहिलेली आहे. संपूर्ण तालुक्यात एक अत्यंत भ्रष्ट अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. ठराविक टक्केवारी घेतल्याशिवाय ठेकेदारांची बिले मंजूर न करणे, हा त्यांचा मुख्य धंदा बनला आहे. यामुळेच त्यांच्या कार्यकाळात झालेली बहुतांश विकासकामे निकृष्ट दर्जाची झाली असून, याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत.
एवढेच नव्हे तर, आपल्या पदाचा गैरवापर करून त्यांनी स्वतःच्या मुलालाच ठेकेदार बनवले आणि अनेक कामांची खिरापत त्याला वाटली. अशा प्रकारे दुहेरी मलिदा लाटणाऱ्या या अधिकाऱ्याकडे जेव्हा जनतेचे प्रश्न घेऊन विद्यमान खासदार संपर्क साधतात आणि हा अधिकारी त्याला दाद देत नाही, तेव्हा लोकप्रतिनिधींमध्ये चीड निर्माण होणे साहजिक आहे.
या कथित ऑडिओ क्लिपवरून आता राजकारण तापू लागले असून, तालुक्यातील माजी आमदार आणि जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री यावर आक्रमक झाले आहेत. मात्र, टीका करण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या कारभाराचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. माळशिरस तालुक्यातील अधिकारी या माजी आमदारांच्या मानसिक त्रासामुळे आणि छळामुळे किती वैतागलेले आहेत, हे जाणून घेण्यासाठी त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्याची वेळ आली आहे. हप्तेवसुली आणि दमबाजीमुळे या तालुक्यात प्रामाणिक अधिकारी काम करायला तयार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, “हे खपवून घेतले जाणार नाही,” असा इशारा देणाऱ्या पालकमंत्र्यांच्या नैतिकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ज्या पालकमंत्र्यांवर महिला शोषणासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि ज्यांना वेगवेगळ्या गुन्हाखाली तुरुंगाची हवा खावी लागली आहे, त्यांना अशा प्रकरणावर बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? असा रोखठोक प्रश्न आज माळशिरस तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील सुजाण नागरिक विचारत आहेत.
दरम्यान, संबंधित उपअभियंत्याचे माळशिरस तालुक्यातील ‘काळे कारनामे’ आणि त्यांच्या भ्रष्टाचाराची संपूर्ण कुंडली लवकरच महर्षि डिजिटल न्यूज’च्या माध्यमातून पुराव्यांसह जनतेसमोर आणली जाईल.



