पत्नीशी संबंधांच्या संशयातून तिघांकडून बेदम मारहाण; अकलूज मध्ये एकाचा मृत्यू

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : माळशिरस तालुक्यातील संग्रामनगर येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अशोक मुजमुले (रा. संग्रामनगर, ता. माळशिरस) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात तिघांविरोधात खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी सौ. सावित्री अशोक मुजमुले या कुटुंबासह संग्रामनगर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे पती अशोक मुजमुले हे वाहन चालक म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दिनांक ११ मे २०२६ रोजी सायंकाळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नरेंद्र खैरमोडे याच्यासोबत मुलींना बोलण्याच्या कारणावरून वाद झाला होता. यावेळी नरेंद्र खैरमोडे याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे अशोक मुजमुले यांनी पत्नीला सांगितले होते.
यानंतर रात्री सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास “भांडण मिटवण्यासाठी बोलावले आहे,” असे सांगून अशोक मुजमुले घराबाहेर गेले. दरम्यान, रात्री सुमारे ९.४५ वाजता त्यांनी पत्नी सावित्री मुजमुले यांना फोन करून ट्रेंड मॉलजवळ औदुंबरनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर नरेंद्र खैरमोडे, वैभव खैरमोडे आणि योगेश धाईंजे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे सांगितले. त्यानंतर सावित्री मुजमुले व त्यांची मुलगी अकलूज पोलीस ठाण्यात दाखल झाल्या.
मारहाणीनंतर अशोक मुजमुले यांच्या अंगावरील शर्ट व बनियनवर रक्त लागलेले दिसून आले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, अकलूज येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अशोक मुजमुले यांनी नरेंद्र खैरमोडे याने पत्नीशी संबंध असल्याचा संशय घेऊन मारहाण केल्याचे पत्नीला सांगितले. तसेच वैभव खैरमोडे याने डोक्यात दगड मारल्याचाही आरोप त्यांनी केला होता.
दरम्यान, १२ मे रोजी पहाटे तीनच्या सुमारास अशोक मुजमुले यांना उलट्या होऊ लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी डोक्याला गंभीर मार लागल्याचे सांगत पुढील उपचारासाठी सोलापूर अथवा पुणे येथे हलविण्याचा सल्ला दिला. नातेवाईक पुढील उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्यांची प्रकृती अधिक खालावली. त्यानंतर त्यांना पुन्हा उपजिल्हा रुग्णालय, अकलूज येथे आणण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या प्रकरणी सावित्री मुजमुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नरेंद्र खैरमोडे, वैभव खैरमोडे व योगेश धाईंजे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत खून, दुखापत, धमकी व संगनमताच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे करीत आहेत.



