गडकरी साहेब अकलूज–वेळापूर रस्त्यासाठी पण निधी द्या ; आ. उत्तमराव जानकर यांच्याकडून सीआरएफमधून ४८ कोटींच्या निधीची मागणी

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : माळशिरस तालुक्यातील अकलूज–वेळापूर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून, या रस्त्याच्या काँक्रीटीकरण व मजबुतीकरणासाठी केंद्रीय रस्ता निधी (सीआरएफ) योजनेअंतर्गत सुमारे ४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार उत्तमराव जानकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे केली आहे.
इंदापूर–अकलूज–सांगोला–जत–मेंढेगिरी–उमराणी राज्य महामार्ग क्रमांक १२५ अंतर्गत येणारा अकलूज–वेळापूर हा मार्ग अत्यंत खराब अवस्थेत असून माळशिरस तालुक्यातील कि.मी. २९/१०० ते ३९/४०० दरम्यानचा रस्ता मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाला आहे. त्यामुळे वाहनधारक, शेतकरी, व्यापारी, प्रवासी तसेच पंढरपूरकडे जाणारे भाविक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने आवश्यक निधी उपलब्ध झाला नाही. तसेच इंदापूर–अकलूज–वेळापूर–जत हा मार्ग राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट झाल्यानंतर अकलूज–वेळापूर रस्त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले. परिणामी रस्त्याची दुरवस्था वाढत असून अपघातांची शक्यता देखील वाढली आहे.
हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८सी तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ ला जोडणारा महत्त्वाचा दुवा असून पंढरपूर तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या भाविकांसाठीही प्रमुख मार्ग मानला जातो. त्यामुळे या रस्त्याचे धार्मिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मोठे महत्त्व असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आमदार उत्तमराव जानकर यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र तथा युवा नेते जीवन भैया जानकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर केले. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील , पंचायत समिती सभापती दत्ता भैया मगर, जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सभापती मच्छिंद्र ठवरे, माजी पंचायत समिती सदस्य अजय सकट, भानुदास सालगुडे पाटील, सोमनाथ पिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
अकलूज–वेळापूर रस्त्याच्या कामास तातडीने मंजुरी मिळून नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



