शांतीतच होणार क्रांती : अकलूजच्या जनतेच्या मनात घर केलेली मोहिते-पाटलांची परंपरा

महर्षि डिजीटल न्यूज /सागर खरात
राज्यातील नगरपरिषद निवडणुकांची घोषणा होताच संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र, अकलूजचे सत्ताधारी शांत आहेत. का? याबाबत तर्क वितर्क लढवले जात असले तरी त्याची पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे आहे.
अकलूज… हे गाव फक्त एक नाव नाही, ती एक परंपरा आहे. ती म्हणजे मोहिते-पाटलांची परंपरा. गेल्या चार पिढ्यांपासून अकलूजच्या प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये आणि प्रत्येक मनामनात ज्यांचं नाव कोरलं गेलं आहे, ते म्हणजे मोहिते-पाटील घराणं.
या वेळेस पहिल्यांदाच नगरपरिषदेची निवडणूक होत असली तरी, अकलूजकरांच्या मनात कोण आपले, कोण गावासाठी जगले आणि कोण गावासाठी झटले याचं स्पष्ट भान आहे. कारण, अकलूजच्या प्रत्येक विकासकामाच्या मुळाशी जर कुणाचं नाव लिहायचं असेल, तर ते आहे – मोहिते-पाटील.
आज काही लोक राजकारणाला धमक्या, पैशांची आमिषे आणि दबावाचं साधन बनवत आहेत. सत्तेच्या जोरावर, खोट्या आश्वासनांच्या आधारावर काही जण भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, गावकर्यांच्या हृदयातले विश्वासाचे राज्य कोणत्याही सत्तेच्या जोरावर जिंकता येत नाही.
मोहिते-पाटील यांनी कधीच राजकारण हे संघर्षाचं नव्हे, तर सेवेचं शास्त्र मानलं. म्हणूनच त्यांनी अकलूजमध्ये विकास, शिक्षण, शेती, उद्योग आणि समाजकारण यांचा सुंदर संगम घडवला. हे घराणं कधीही सूड, द्वेष किंवा दिखावा यांच्या मागे धावलं नाही. त्यांच्या प्रत्येक कृतीत शांतता, संयम आणि सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन घडले आहे.
आज जेव्हा विरोधक सत्तेचा गैरवापर करून, काही मोजक्या लोकांना आपल्या गोटात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा मोहिते-पाटील शांत आहेत. कारण त्यांना ठाऊक आहे – लोकांचा विश्वास हा कोणत्याही सत्तेपेक्षा मोठा असतो.
शांतता ही कमजोरी नसते; ती शक्ती असते. तीच शक्ती आता शांततेच्या क्रांतीतून रूपांतरित होणार आहे.
मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली अकलूज पुन्हा एकदा आपली गौरवशाली परंपरा जपणार, ही भावना आज प्रत्येक अकलूजकराच्या मनात आहे.
अकलूज हे त्यांचं घर आहे, आणि घराचं रक्षण हीच खरी सेवा. मोहिते-पाटील यांचं हे शांत नेतृत्व, त्यांच्या विचारांची खोली आणि जनतेवरील आपुलकी – या तिन्ही गोष्टी मिळूनच अकलूजच्या भविष्यातील नवी क्रांती घडवतील. कारण, ही क्रांती आवाजात नाही… ही क्रांती आहे ‘शांततेतून उगवणार्या विश्वासाची.’ हीच खरी अकलूजची ओळख, आणि हीच मोहिते-पाटलांची परंपरा.



