खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून अकलूज येथील व्यावसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न; दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज, :खाजगी सावकारांच्या सततच्या त्रासाला कंटाळून अकलूज येथील एका भात विक्रेत्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अकलूज पोलिसांनी दहा जणांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियमासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी मुनावर गुलमहंमद खान (वय ४८ वर्षे) रा. जुना बाजारतळ, अकलूज हे गेल्या काही वर्षांपासून “राईस गाडा” व्यवसाय करतात. त्यांनी सन २०२१ पासून वेळोवेळी खाजगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जावरून त्यांच्याकडून वारंवार धमक्या व शिवीगाळी सुरू असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
तक्रारीनुसार, दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता, आरोपी सिद्धार्थ पवार हा फिर्यादीच्या घरी येऊन आई-बहिणीवरून शिवीगाळ करत कर्ज व व्याजाचे पैसे एका तासात द्यावेत, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. यावेळी त्याने फिर्यादीच्या पत्नी व मुलांना देखील शिवीगाळ करून अंगावर धावून गेल्याचे फिर्यादीने सांगितले आहे.
या प्रकाराला कंटाळून त्याच दिवशी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास, मुनावर खान यांनी अकलूज एस.टी. नविन स्थानकासमोरील बागेत बुटेक्स नावाचे विषारी औषध प्राशन केले. त्यांना बेशुद्ध अवस्थेत पाहून त्यांच्या ओळखीच्या लोकांनी कुटुंबीयांना कळविले. मुलाने तत्काळ त्यांना अकलूज येथील अपेक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान ९ नोव्हेंबर रोजी ते शुद्धीवर आल्यावर पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून आरोपींविरुद्ध कारवाई केली.
या प्रकरणी अकलूज पोलिसांनी खालील दहा आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ७३०/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे –
१) अनिल मदने (रा. महादेवनगर, अकलूज)
२) सिद्धार्थ पवार (रा. अकलूज)
३) मनोज साळुंखे (रा. अकलूज)
४) भैय्या दत्तात्रय जगदाळे (रा. सराटी, ता. इंदापूर, जि. पुणे)
५) गुरु पवार (रा. लोणार गल्ली, अकलूज)
६) सोनु मोहीते (रा. संग्रामनगर, ता. माळशिरस)
७) गौरव माने (रा. मळोली, ता. माळशिरस)
८) अवधुत शेंडगे (रा. वेळापूर, ता. माळशिरस)
९) सचिन खिलारे (रा. अकलूज)
१०) विलास मारकड (रा. खुडूस, ता. माळशिरस)
या सर्व आरोपींविरुद्ध BNS कलम ३५१(२), ३५१(३), ३५२, ३२४(४), ३(५) तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९ व ४५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून परागंदा असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच संबंधित आरोपींच्या ठिकाणाबाबत कोणाला काही माहिती असल्यास अकलूज पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
खाजगी सावकारीच्या वाढत्या त्रासांमुळे व्यापाऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याची ही घटना ठळक उदाहरण ठरत आहे. पोलिसांनी अशा बेकायदेशीर सावकारांविरोधात तक्रारी नोंदवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.



