ग्रामीण डिजिटल क्रांतीकडे माढा मतदारसंघाची वाटचाल, २१ गावांना मोबाईल कनेक्टिव्हिटी ; खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पुढाकाराला यश

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक दुर्गम गावांमध्ये मोबाईल नेटवर्कच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांचा व्यवसाय, आरोग्यसेवा आणि नागरिकांचा दैनंदिन संवाद यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत होता. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले असून, केंद्रीय संचार मंत्री ज्योतीराजदित्य शिंदे यांनी सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील एकूण २१ गावे ‘डिजिटल भारत निधी’ (DBN) अंतर्गत 4G सॅच्युरेशन स्कीममध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार डिसेंबर २०२६ पर्यंत या सर्व गावांना मोबाइल कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे.
ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यात अडचणी येत होत्या. आरोग्यसेवेतील दूरध्वनी सुविधा खंडित होत होत्या, तर शेतकऱ्यांना हवामान अंदाज किंवा बाजारभाव याबाबत माहिती मिळणे कठीण होत होते. ही परिस्थिती बदलावी, यासाठी खासदार मोहिते पाटील यांनी नवी दिल्लीतील भेटीत केंद्रीय मंत्र्यांसमोर ठोस मांडणी केली होती. त्यानंतरच या गावांचा या महत्त्वाकांक्षी योजनेत समावेश झाला.
कोणकोणती गावे होणार जोडली
- सोलापूर जिल्ह्यातील (१७ गावे): अंजनडोह, विहाळ, मोरवड, काञज, कोंढरचिंचोली, मांजरगाव, घोटी, आवाटी, जातेगांव, आळजापूर, गौंडरे, हिवरे, निमगाव ह., कुंगाव, पाथर्डी, चिंचोली, गोरेवाडी.
- सातारा जिल्ह्यातील (४ गावे): संभुखेड, इंजबाव, खडकी, हवलदारवाडी.
या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात ऑनलाइन क्लासेस शक्य होणार, आरोग्यसेवेतील टेलिमेडिसिन सेवा उपलब्ध होईल, तर शेतकरी थेट मोबाईलवर बाजारभाव, हवामान अंदाज यांची माहिती घेऊ शकतील. लहान व्यवसायांना डिजिटल व्यवहारांचा फायदा मिळणार असून, ग्रामीण विकासाचा वेग वाढेल.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी याबाबत समाधान व्यक्त करताना, “माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव डिजिटल सुविधांनी सक्षम व्हावे, हीच माझी धडपड आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला यातून मोठा दिलासा मिळणार आहे,” असे मत व्यक्त केले.
केंद्रीय मंत्री ज्योतीराजदित्य शिंदे यांचे आभार मानत त्यांनी या पुढाकाराला ग्रामीण भागातील ‘डिजिटल क्रांतीची नांदी’ असे संबोधले आहे.



