महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीवर आमदार अभिजीत पाटील यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : राज्याचे भविष्य घडवण्यासाठी ठोस व परिणामकारक युवा धोरण तयार करण्याच्या दिशेने महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून या समितीवर माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या समितीची घोषणा राज्य शासनाने केली असून, यात राज्यातील युवकांच्या शिक्षण, रोजगार, क्रीडा तसेच सामाजिक नेतृत्वासाठी नवे मार्ग खुले करण्याचा प्रयत्न होणार आहे.
या समितीमध्ये आमदार अभिजीत पाटील यांच्यासह विधानपरिषदेचे सदस्य अमोल गणपत गोर्से आणि राष्ट्रीय युवा पुरस्कारप्राप्त सुषमा एकलरे यांचा समावेश आहे.
युवा धोरण समितीवर निवड झाल्यानंतर आमदार अभिजीत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच क्रीडा विभागाचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “युवकांच्या स्वप्नांना दिशा देणारे आणि नव्या संधी निर्माण करणारे धोरण बनवण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहीन. युवकांसाठी शिक्षण, रोजगार, क्रीडा आणि सामाजिक नेतृत्व या क्षेत्रात परिणामकारक धोरणे राबवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.”
राज्यातील युवकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे व त्यांना सक्षम बनवणारे धोरण या समितीच्या माध्यमातून उभे राहणार असल्याने अभिजीत पाटील यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.



