युवक-महिलांसाठी करिअर व कौशल्यविकासाच्या संधी; अकलूजमध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विविध कार्यशाळांचे आयोजन

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विविध कौशल्यविकास कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी तसेच विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कौशल्य विकास केंद्र’ (PM USHA योजने अंतर्गत) सुरू करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे मार्गदर्शन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील करीत आहेत. कार्यशाळांची माहिती देताना शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शीतलदेवी मोहिते पाटील म्हणाल्या की, “ग्रामीण भागातील युवक-युवती व महिलांना रोजगार व उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.”
अकलूज येथील उदय सभागृह, शंकरनगर येथे बुधवार दि. १० सप्टेंबर ते शनिवार दि. १४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत या कार्यशाळांचे आयोजन होणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या उपक्रमात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअर संधी, महिला बचत गटांसाठी कौशल्य विकासाचे पर्याय, पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्ये व नोकरीच्या संधी तसेच राजकीय नेतृत्वातील कौशल्य विकास या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
सहभागींना कार्यशाळेतून आधुनिक करिअर ट्रेंड्स, रोजगार निर्मिती व नेतृत्वगुणांविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच सहभाग नोंदवणाऱ्यांना अधिकृत प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
या कार्यशाळांमुळे युवक-युवती व महिला वर्गामध्ये आत्मविश्वास वाढून रोजगार, स्वावलंबन आणि समाजकार्यातील सक्रियता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणेतून समाजातील सर्व घटकांना प्रगतीची नवी दिशा दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.



