अकलुजच्या नृत्यरंगम् कलामंदिरच्या नृत्यांगनांची कृष्णरंग महोत्सवात मनमोहक प्रस्तुती

महर्षि डिजीटल न्यूज
सोलापूर : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने संस्कार भारती आणि सर्व शास्त्रीय नृत्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कृष्णरंग’ या भक्तिगीतांवर आधारित शास्त्रीय नृत्य सोहळ्यात अकलुजच्या ‘नृत्यरंगम् कलामंदिर’च्या पाच नृत्यांगनांनी आपल्या भावपूर्ण आणि देखण्या नृत्यप्रस्तुतींनी प्रेक्षकांची मने जिंकली.
रविवार, १० ऑगस्ट २०२५ रोजी श्री शिव छत्रपती सभामंडप येथे पार पडलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आचार्य शास्त्री हेमंतदास पं. माळके (अध्यक्ष – पश्चिम प्रांत), अमित मराठे (सहसमन्वयक – पश्चिम प्रांत), डॉ. स्वाती दातार (नृत्यविभाग संयोजक – पश्चिम प्रांत) आणि उद्योजिका डॉ. सुकन्या शहा (प्रेसिजन प्रायव्हेट लिमिटेड) उपस्थित होते.
मिष्का राजीव गांधी, सायशा प्रशांत खरतमल, शताक्षी प्रशांत कुलकर्णी, अमृता अनंत कुलकर्णी आणि कीर्ती तानाजी साठे या नृत्यांगनांनी श्रीकृष्णाच्या जीवनातील भक्तिरस, लीलारस आणि भावभावना यांना साजेशी मोहक नृत्यसादरीकरणे केली. त्यांच्या सुसंवादी मुद्राभिनय, लयतालातील अचूकता आणि भावपूर्ण अभिनयामुळे सभागृहात टाळ्यांचा गजर घुमला.
गेल्या १२ वर्षांपासून अकलूज येथे दर्जेदार शास्त्रीय नृत्य शिक्षण देणाऱ्या ‘नृत्यरंगम् कलामंदिर’ने या निमित्ताने पुन्हा एकदा आपली सांस्कृतिक गुणवत्ता सिद्ध केली. या यशामागे नृत्यगुरू सचिदानंद शिवदत्त नारायणकर आणि सौ.सोनम वोरा नारायणकर यांचे समर्पित मार्गदर्शन लाभले.
सादरीकरणानंतर सर्व नृत्यांगनांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. भक्तिरस, नृत्य आणि कलात्मकतेचा संगम असलेला ‘कृष्णरंग’ हा सोहळा प्रेक्षकांच्या मनात कायमचा घर करून गेला.



