“माळशिरस तालुका हप्तेखोरांच्या ताब्यात? आमदारांच्या आक्रमक भूमिकेनंतरही अवैध धंदे मोकाट सुरू असल्याची चर्चा

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : मागील महिनाभरात थोडाफार आवर घालण्यात आलेल्या माळशिरस तालुक्यातील अवैध धंद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मटका, दारू, गुटखा, जुगार यांसारख्या बेकायदेशीर व्यवहारांनी चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अक्षरशः धुमाकूळ घातला असून, या धंद्यांवर पोलिसांची छत्रछाया असल्याची चर्चा गावागावांत जोरात रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या आमसभेत माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी पोलिसांना अवैध धंद्यांवर लगाम घालण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. या आदेशानंतर सुरुवातीला काही दिवस कारवाईचा बडगा उगारला गेला, धंदेवाले दबले गेले आणि बाजारपेठेत हालचाल जाणवली. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच परिस्थिती पालटली. आमदारांच्या सूचनांकडे पोलिसांनी जणू दुर्लक्ष केले असून, अवैध धंदेवाले आता पूर्वीपेक्षा अधिक जोरात उघडपणे व्यवहार करताना दिसत आहेत.
नातेपुते, माळशिरस, अकलूज आणि वेळापूर — या चारही पोलीस स्टेशन हद्दीत सध्या सर्वच प्रकारचे अवैध धंदे मोकाट सुटले आहेत. मटका गावोगावी, चौकाचौकात उघडपणे खेळला जात आहे. दारू व गुटखा खुलेआम विक्री होत असून, काही ठिकाणी तर पोलीस ठाण्याच्या जवळच हे व्यवहार सुरू असल्याची चर्चा आहे. शिवाय जुगार अड्ड्यांवर रात्री उशिरापर्यंत खेळाडूंची रांग लागते, अशी खात्रीशीर माहिती आहे.
विशेष म्हणजे, या धंद्यांसाठी घेतला जाणारा हप्ता अचानक वाढवण्यात आल्याचे समजते. जुन्या दराच्या दुप्पट-तिप्पट वसुलीवर ‘मोकळी सूट’ देण्यात आल्याचे आरोप होत आहेत. यामागे केंद्र व राज्यातील सत्ताधारी पक्षाशी संबंधित व्यक्तींचा हात असल्याची कुजबुज आहे. परिणामी, प्रामाणिक करदाते आणि कायद्याचे पालन करणारे नागरिक संतप्त झाले आहेत.
कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांकडूनच हप्त्यांच्या खेळातून या धंद्यांना संरक्षण मिळत असल्याचा संशय अधिक घट्ट होत आहे. आमदारांचा आदेश आहे, मग कारवाई का नाही? की आदेश फक्त कागदापुरतेच? असा सवाल जनतेतून होत आहे.
माळशिरस तालुक्यात अवैध धंद्यांचे मूळ खोलवर रुजलेले आहे. काही दिवस कारवाई झाली की काही काळ शांतता, मग पुन्हा डोके वर काढणे — हा चक्रव्यूह मोडायचा असेल तर पोलिस आणि राजकीय पातळीवरून खर्या अर्थाने धाडस दाखवावे लागेल. अन्यथा, हप्त्यांचा खेळ सुरू राहील आणि अवैध धंद्यांची ही सावली तालुक्याच्या माथ्यावर कायम राहील.



