खा.धैर्यशील मोहिते पाटील यांची भारतीय मौसम विज्ञान विभागाला भेट ; माढा मतदारसंघातील हवामान बदलावर शास्त्रीय अभ्यास करण्याची केली मागणी

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : माढा लोकसभा मतदारसंघातील सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या भागात वाढत्या हवामान बदलांचा सखोल अभ्यास करण्याची मागणी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भारतीय मौसम विज्ञान विभागाकडे केली आहे. यासाठी त्यांनी दिल्लीतील भारतीय मौसम विभागाचे महासंचालक डॉ.मृत्युंजय मोहपात्रा यांची नुकतीच भेट घेतली आणि संबंधित निवेदन सादर केले.
खासदार मोहिते-पाटील यांनी माण, खटाव, कोरेगाव, फलटण, माळशिरस व सांगोला या तालुक्यांचा हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणावर होणारा परिणाम अधोरेखित केला. “या भागात पावसाचे अनियमित वितरण, तापमानातील अतिरेक, भूजल पातळीतील घट आणि जैवविविधतेतील र्हास दिसून येतो. यामुळे शेती उत्पादन, मृदा गुणवत्ता आणि जलस्रोतांवर प्रतिकूल परिणाम होत आहे,” असे त्यांनी निदर्शनास आणले.
त्यांनी हवामान बदलाशी निगडीत जलसंवर्धन, मृदासंवर्धन आणि वनीकरणासंबंधी संशोधन करण्यासाठी भारतीय मौसम विभागाने विशेष अभ्यास सुरू करावा, अशी विनंती केली. तसेच शेतकऱ्यांना याबाबत शास्त्रीय मार्गदर्शन उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीला सकारात्मक प्रतिसाद देताना महासंचालक मोहपात्रा यांनी हवामान बदलाच्या परिणामांचा सखोल अभ्यास करण्याचे आश्वासन दिले. याबाबत लवकरच तज्ज्ञ पथक पाठवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या पुढाकाराचे माढा मतदारसंघातील शेतकरी, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत असून, हवामान बदलाच्या समस्येकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधल्याबद्दल खासदार मोहिते-पाटील यांचे मतदार संघातील नागरिकांकडून होत आहे.



