पत्नीच्या खुनाच्या प्रकरणी पतीस जन्मठेपेची शिक्षा ; तब्बल सात वर्षानंतर श्रीपुर येथील घटनेचा निकाल

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : दिनांक ८ नोव्हेंबर २०१८ रोजी अकलूज येथील श्रीपूर साखर कारखान्याच्या गेटजवळ राहणाऱ्या सुषमा गणेश टिंगरे यांचा संशयित पती गणेश कांतीलाल टिंगरे याने खून केल्याप्रकरणी आता माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सदर प्रकरणात अकलूज पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५०२/२०१८ अन्वये भा.दं.वि. कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात निष्पन्न झाल्याप्रमाणे, मयत सुषमा हिला तिचा पती गणेश टिंगरे वारंवार चारित्र्यावर संशय घेत मारहाण व शिवीगाळ करीत होता. शेजारी राहत असलेले शौकत मौला मुलाणी यांनी यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न देखील केला होता. एकदा तर गणेशने सुषमाचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला होता. त्यामुळे सुषमा काही काळ तिच्या आई-वडिलांकडे राहायला गेली होती.
मात्र दिवाळी सणानिमित्त ती परत श्रीपूर येथे आली होती. त्या दिवशी आरोपी गणेशने सुषमाच्या मुलांना खाऊ आणण्यासाठी बाहेर पाठवले व दरवाजा बंद करून सुषमाचा खून केला. नंतर त्याने शौकत मुलाणी यांना याची माहिती दिली. शौकत यांनी सुषमा मृत अवस्थेत असल्याचे पाहून तात्काळ अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलीस तपासात मृत सुषमा हिच्या डोक्यावर गंभीर जखमा, गळ्यावर व्रण व कपाळावर इजा आढळली. शवविच्छेदन अहवालात देखील डोक्यावर गंभीर जखमा असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी शौकत मुलाणी, मयताची मुले सृष्टी व ओम टिंगरे, शवविच्छेदन करणारी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका सिद यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. आरोपीने इतर साक्षीदारांसमोर देखील खुनाची कबुली दिली होती, असे न्यायालयात स्पष्ट झाले.
या सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी गणेश कांतीलाल टिंगरे यास भा.दं.वि. कलम ३०२ नुसार आजन्म कारावास व २००० रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्याचा कालावधी शिक्षेमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
या प्रकरणात पोलीस हेडकॉन्स्टेबल रियाज तांबोळी व पोलीस नाईक हरिश भोसले यांनी न्यायालयीन पैरवी केली. सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने हे तपास अधिकारी होते. तर सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता संग्राम पाटील आणि एस.टी. मेंढेगिरी यांनी यशस्वी कामगिरी बजावली.



