लवंग ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सज्जन दुरापे यांची निवड

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : लवंग ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सज्जन दुरापे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. सामाजिक कार्यात सक्रिय आणि युवा नेतृत्व म्हणून परिचित असलेल्या सज्जन दुरापे यांच्या निवडीने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सज्जन दुरापे हे मोहिते-पाटील कुटुंबाचे निष्ठावान समर्थक असून, त्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनापासूनच शिव कीर्ती युवा मंच या माध्यमातून सामाजिक कार्याची ठोस वाटचाल सुरू केली. युवकांमध्ये नेतृत्वगुण, संघटन कौशल्य आणि सामाजिक जाणिवा विकसित करणाऱ्या सज्जन दुरापे यांनी विविध उपक्रमांमधून ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या ते शिवरत्न उद्योग समूहाचे चेअरमन कीर्तीध्वजसिंह मोहिते पाटील आणि अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या या निवडीमुळे लवंग गावाच्या विकासाला गती मिळेल, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
गावच्या प्रगतीसाठी, युवा वर्गाच्या सक्षमीकरणासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी सज्जन दुरापे प्रयत्नशील राहतील, असा विश्वास नव्या नेतृत्वाकडून व्यक्त केला जात आहे.



