मराठा सेवा संघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन १० मेपासून अकलूजमध्ये ; विचारांचा जागर, सांस्कृतिक सोहळे अन् व्याख्यानांची मेजवानी

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : मराठा सेवा संघाचे राज्यस्तरीय तीन दिवसीय महाअधिवेशन येत्या शनिवार, दि. १० मे २०२५ पासून अकलूज येथे सुरू होत आहे. या अधिवेशनात विचारांचा जागर, शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, काव्यसंमेलन, परिसंवाद आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, हे अधिवेशन १२ मेपर्यंत चालणार आहे.

अधिवेशनाची माहिती अकलूज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उत्तमराव माने शेंडगे यांनी दिली. यावेळी समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, धनाजी माने, जिल्हा सचिव हेमलता मुळीक, जिल्हाध्यक्ष (जिजाऊ ब्रिगेड) मनोरमा लावंड, वनिता कोरटकर, प्रियाताई नागणे, शारदा चव्हाण, मनीषा जाधव, सुवर्णा घोरपडे, रवींद्र पवार, अशोकराव रणवरे, दिगंबर मिसाळ, नवनाथ कोडक, सिद्धेश्वर नागटिळक, शिवाजी शिंदे, बाळासाहेब पराडे, डॉ. अमोल माने, सचिव राजेंद्र मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासून प्रत्येक जिल्ह्यात अधिवेशने होतात. यापूर्वी सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे १९९८ साली ८वे अधिवेशन झाले होते. यंदा सोलापूर जिल्ह्याला महाअधिवेशन घेण्याचा मान मिळाल्याने अकलूज येथील स. म. शंकरराव मोहिते पाटील स्मृती भवन येथे हे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. दररोज सुमारे १५०० प्रतिनिधींची उपस्थिती अपेक्षित असून, चहापान, भोजन व मुक्कामाची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.
दिवस १: शनिवार, १० मे २०२५
- सकाळी ११ वाजता उद्घाटनपूर्व सत्रात ‘मराठा सेवा संघ व ३३ कक्ष बळकटीकरण व पुनर्बांधणी’ या विषयावर संस्थापक अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांचे मार्गदर्शन होईल.
- दुपारी २ वाजता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे, प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार समाधान आवताडे, दिलीप सोपल, उत्तम जानकर, नारायणआबा पाटील, राजू खरे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
- सांस्कृतिक कार्यक्रमांत शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांचा शाहीरी कार्यक्रम, ‘अकलूज: इतिहास व विकास’ डॉक्युमेंटरी, ‘श्री राज्ञी सखी जयति’ हा एकपात्री प्रयोग सादर केला जाईल.
- संध्याकाळी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने संस्कृती यात्रा व ग्रंथदिंडी, तसेच “जागर विचारांचा, जागर संस्कृतीचा” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
दिवस २: रविवार, ११ मे २०२५
- सकाळी ‘सूर्योदयाच्या कविता’ या उपक्रमात मान्यवर कवी कविता सादर करतील.
- व्याख्याने:
- प्रा. प्रेमकुमार बोके, इतिहासाचार्य म.म. देशमुख, प्रा. शरद पाटील, डॉ. किशोर ढमाले यांचे विचारमंथन.
- डॉ. अशोक राणा (मराठा इतिहास व द्वेषाचे राजकारण), डॉ. सतीश तराळ (सांस्कृतिकरणाची आवश्यकता), संजय कळमकर (आनंदाने जगणे), डॉ. शरद बविस्कर (प्रबोधनाची देशीयता व वैश्विकता).
- विजय चोरमारे (माध्यम जगत व मराठा समाज), निर्मलकुमार देशमुख (आंतरराष्ट्रीय घडामोडी व संघ).
- रात्री गझल मैफलीचे आयोजन.
दिवस ३: सोमवार, १२ मे २०२५
- नवोदित कवींचे काव्यसंमेलन, परिसंवाद, गंगाधर बनबरेसर यांचे ‘नाचू किर्तनाचे रंगी’ विषयावर व्याख्यान.
- महिलांसाठी स्नेहा टोम्पे यांचे ‘महिलांचे जग आणि जगणे’, अॅड. मिलिंद पवार यांचे ‘नित्य नवे कायदे’, किरण माने यांचे ‘कला क्षेत्रातील जातवाद’ या विषयांवरील व्याख्याने.
- समारोपीय सत्रात सन्मान सोहळा:
- राजश्री शाहू कला आश्रयदाता पुरस्कार – जयसिंह उर्फ बाळदादा मोहिते पाटील,
- सामाजिक क्षेत्र – जन्मंजय भोसले (अक्कलकोट अन्नछत्र),
- सिनेमा क्षेत्र – नागराज मंजुळे, किरण माने,
- शाहिरी – शिवशाहीर राजेंद्र कांबळे.
- संध्याकाळी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या लावणी उत्सवाने समारोप.
१९९८ नंतर प्रथमच सोलापूर जिल्ह्यात हे अधिवेशन होत असल्याने संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. मराठा सेवा संघाच्या माळशिरस तालुका व सोलापूर जिल्ह्याच्यावतीने युवक-युवती, महिला व सर्व समाजबांधवांना या वैचारिक मेजवानीचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.