माळशिरस तालुक्याला औद्योगिक उभारणीचा नवा श्वास ; मोहिते पाटील बंधूंच्या प्रयत्नांचे सार्थक, येळीव येथे MIDC साठी अर्ज प्रक्रिया सुरू

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : माळशिरस तालुक्यातील युवाशक्तीला आणि स्थानिक विकासाला चालना देणाऱ्या ऐतिहासिक निर्णयाचा पुढील टप्पा सुरू झाला आहे. तालुक्यातील येळीव (सदाशिवनगर) येथे नव्याने मंजूर झालेल्या MIDC साठी महाराष्ट्र सरकार व MIDC कार्यालय सोलापूर यांच्यावतीने अधिकृतरित्या औद्योगिक भूखंडासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
आ. रणजितसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सदर MIDC साठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने येळीव येथे MIDC मंजूर झाली.
सदर MIDC मध्ये प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप किंवा प्रायव्हेट लिमिटेड अशा कोणत्याही स्वरूपाच्या कंपन्यांना उद्योगासाठी भूखंड मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी MIDC सोलापूर कार्यालयामार्फत अधिसूचना (नोटिफिकेशन) जारी करण्यात आली असून इच्छुक उद्योजकांनी नियोजित कालावधीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन मोहिते-पाटील यांनी केले आहे.
या औद्योगिक वसाहतीमुळे माळशिरस तालुक्यात रोजगारनिर्मिती, आर्थिक वाढ आणि स्थिरता यांना चालना मिळणार आहे. स्थानिक तरुणांसाठी ही सुवर्णसंधी असून उद्योजकांनी पुढाकार घेऊन याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असेही मोहिते-पाटील यांनी नमूद केले.