श्रीपूरमधील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बबनराव वजाळे गुरुजी यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांची सांत्वनपर भेट

महर्षि डिजीटल न्यूज / श्रीपूर :
श्रीपूर पंचक्रोशीतील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ व आदर्श नेते बबनराव वजाळे गुरुजी यांचे चार दिवसांपूर्वी वार्धक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन वजाळे परिवाराला भेट देत सांत्वन केले.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातूनही अनेक मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे तसेच प्रत्यक्ष उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. यामध्ये अॅड. प्रकाशराव पाटील, आमदार उत्तमराव जानकर, नगरपंचायतीचे गटनेते राहुल रेडे पाटील, सुरेश गुंड पाटील, श्रीपाद उर्फ भाऊसाहेब कुलकर्णी, पत्रकार चंदकांत कुंभार, पत्रकार भारत मगर, आरपीआयचे तालुकास्तरीय पदाधिकारी व अनेक स्थानिक सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी भेट देऊन दुःख व्यक्त केले.
माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी समीर व शेखर वजाळे यांना दूरध्वनीवरून शोक व्यक्त करत आपल्या भावना कळवल्या. युरोप दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनीही वजाळे परिवारासोबत असलेला जुना संबंध नमूद करत शोकसंदेश पाठवला आहे. गृहनिर्माण सल्लागार समितीचे अध्यक्ष राजेंद्र मिरगणे, ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत नायकोडे, गावकूसचे संपादक विष्णू बिचकुले, महूदचे सरपंच सुरेश पाटील, कार्यकारी अभियंता संदीप पाटील (मुंबई), माळशिरस तालुक्याचे उपसभापती प्रतापराव पाटील, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साहेबराव देशमुख यांनीही वजाळे गुरुजींच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. गेल्या दोन दिवसांत असंख्य नागरिकांनी वजाळे गुरुजींच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
गेल्या ६० ते ७० वर्षांत श्रीपूरमधील सामाजिक, राजकीय व परिवर्तनवादी चळवळींमध्ये बबनराव वजाळे गुरुजींनी सक्रिय सहभाग घेतला होता. ते या चळवळींचे ऐतिहासिक साक्षीदार व कार्यप्रवण नेतृत्व होते. त्यांच्या जाण्याने श्रीपूर पंचक्रोशीतील सामाजिक, राजकीय आणि आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे, अशा भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या.