पुनर्वसित गावांच्या दीर्घकालीन समस्या सोडवणारी बैठक ; खासदारांच्या संवेदनशीलतेची, बांधिलकीची आणि ठाम नेतृत्वाची जिवंत साक्ष

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा आणि पंढरपूर तालुक्यांतील पुनर्वसित गावांच्या दीर्घकालीन समस्या सोडवण्यासाठी नुकतीच जिल्हा नियोजन भवन सोलापूर येथे झालेली उच्चस्तरीय बैठक ही केवळ एक प्रशासकीय बैठक नव्हती, तर ती एका खर्या लोकप्रतिनिधीच्या संवेदनशीलतेची, बांधिलकीची आणि ठाम नेतृत्वाची जिवंत साक्ष होती – ती होती खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सक्रिय पुढाकाराची.
पुनर्वसित गावांच्या नागरी सुविधा, जमीन मालकी, नकाशे, विद्युतीकरण आणि ग्रामपंचायत विभाजन यांसारख्या गुंतागुंतीच्या प्रश्नांना केवळ तांत्रिक समस्यांसारखे न पाहता, त्या मागचं मानवी दुःख आणि अडचणी समजून घेण्याची संवेदनशीलता मोहिते पाटील यांनी दाखवली. विशेषतः काही गावांतून कार्यालयासाठी नागरिकांना 15 कि.मीचा प्रवास करावा लागतो, ही बाब त्यांनी अधोरेखित करत शासनदरबारी तीव्रपणे मांडली.
यापूर्वी अनेक वर्षे या गावांच्या समस्या ‘फाईलवर’ होत्या. परंतु धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रशासकीय, राजकीय आणि स्थानिक लोकांच्या सहभागातून मुद्द्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा दृष्टीकोन घेतला. त्यांनी उपस्थित अधिकार्यांकडून ठोस कार्यवाहीची हमी घेतली आणि 10 दिवसांत आढावा घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
प्लॉट नंबर, सातबारा, सिटी सर्व्हे आणि ग्रामपंचायत यामध्ये असलेली विसंगती ही केवळ प्रशासकीय गुंतागुंत नव्हती, ती हजारो कुटुंबांच्या हक्कांच्या नोंदींचा प्रश्न होता. हे समजून घेऊन तीन विभागांमध्ये समन्वय साधत एकसंध व्यवस्था उभारण्याचा निर्णय खासदार मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने झाला.
पुनर्वसनाच्या वेळी दिलेल्या 18 नागरी सुविधांपैकी अनेक ठिकाणी सुविधा अस्तित्वात नसणे किंवा जीर्णावस्थेतील असणे ही काळजीकारक बाब त्यांनी जोरकसपणे मांडली. त्यांचे मत होते की, ’विकास हा कागदावर नव्हे, जमिनीवर उतरलेला हवा’ आणि यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेने गावांचे हस्तांतरण करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली, याची दखल घ्यायलाच हवी.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे केवळ संसदेत बोलणारे किंवा निवडणुकीपुरते दिसणारे लोकप्रतिनिधी नाहीत, तर मैदानात उतरून प्रश्नांचे मूळ शोधणारे आणि उत्तर शोधण्यासाठी कार्यक्षम यंत्रणा सक्रिय करणारे नेतृत्व आहेत. सामाजिक न्यायाची जाणीव आणि ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांच्या जगण्यातील अडथळ्यांवर शासनाकडून उत्तर मिळवण्यासाठी त्यांचा संघर्ष सातत्याने दिसतो.
या बैठकीतून आणि त्यांच्या भूमिकेतून एक गोष्ट स्पष्ट झाली – धैर्यशील मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील पुनर्वसित गावांसाठी केवळ आश्वासन देणारे नव्हे, तर आश्वासक कृती करणारे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचे नेतृत्व हे आजच्या काळातील राजकीय जबाबदारीचा आदर्श ठरावा असेच असल्याचे दिसून येत आहे.