माढा लोकसभा मतदारसंघातील आरोग्य सेवा होणार बळकट ; खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रयत्नांना यश

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : माढा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी! खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माढा मतदारसंघातील विविध तालुक्यांमध्ये नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे व बीपीएचयू (BPHU) प्रकल्पांना केंद्र सरकारकडून मंजूरी मिळाली आहे.
या निर्णयामुळे माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यांतील आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रकल्पांसाठी एकूण सुमारे ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये माढा व सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये बीपीएचयू उभारणीसाठी प्रत्येकी ₹५० लाख, करमाळा तालुक्यात ₹२.९५ कोटी, माळशिरस तालुक्यात ₹२.३५ कोटी आणि पंढरपूरमध्ये ₹२.३५ कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे. करमाळ्यातील कारंजे, नियोरे, फिसरे, मांगी; माळशिरसातील कोथळे, मैडद, शिंगोर्णी; व पंढरपूरमधील होळे, जळोली, पेहे येथे नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची उभारणी केली जाणार आहे.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आता या तालुक्यांतील नागरिकांना अत्याधुनिक आणि सुटसुटीत आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या प्रकल्पांना लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून, संबंधित प्रशासनाकडून तातडीने प्रक्रिया राबवण्यात येत आहे. माढा लोकसभा मतदारसंघाच्या आरोग्य क्षेत्राला चालना देणाऱ्या या निर्णयामुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.



